Breaking newsBuldanaVidharbha

कर्जबाजारीला कंटाळून मोताळा तालुक्यात २२ वर्षात २८5 शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा !

मोताळा-(ब्रेकींग महाराष्ट्र) कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ या निर्सगाच्या दृष्टचक्रामुळे मोताळा तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेनदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोताळा तालुक्यातील वडगाव (खं) येथील 43 वर्षीय शेतकरी किशोर श्रीकांत शेळके यांनी 17 जुलै रोजी स्व:ताच्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली आहे. मोताळा तालुक्यात 22 वर्षाच्या काळात जवळपास 285 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची भयावह आकडेवारी समोर आली आहे.
          वर्षाचे पीकासाठी शेतकरी पाऊस पडल्याने मृगातच पेरण्या करतात. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावते. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. पीककर्ज मिळेपर्यंत सावकाराकडून कर्ज घेवून पेरणी करावी लागते. एवढे करुनही शेतकऱ्यांनी शेतीला लावलेल्या खर्चाएवढे उत्पन्न शेतकऱ्यांना होत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने त्याला आत्महत्या कराव्या लागतात. त्यातच कोरोना काळापासून महागाईचे भाव गगणाला भिडल्याने 85 रुपये किलोने मिळाणारे सोयाबीन तेल आता 150 रुपयांपर्यत गेले, गॅस सिलींडर, डिझेल-पेट्रोल, बी-बियाणे खते यासह आदी जिवनावश्यक वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात पीक आल्यावर मात्र त्यांचे भाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसून शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्याने खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यातच लग्नकार्य, मुला-मुलींचे शिक्षण, वृध्द आई-वडिलांचा दवाखाण्याचा खर्च तर दुसरीकडे बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज, हातउसणे पैश्यांचा तगादा यामुळे शेतकरी कर्ज कसे फेडावे? मुला-मुलींचे लग्न, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत सापडत असल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

बळीराजाच्या दु:खावर शासनाची 1 लाखाची फुंकर..
बळीराजाच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन स्तरावरुन शेकडो योजना राबविण्यात येतात परंतु या योजनांचा गरीब शेतक-यांना वेळीच फायदा होत नाही. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वशीला किंवा पुरेसा पैश्याची रकमेची देवाण-घेवण न केल्यामुळे कित्येक शेतक-यांना शासकीय योजनापासून वंचीत राहावे लागते, यामुळे सुध्दा आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्याग्रस्त शेतक-याला मदत करण्यासाठी शासनस्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने पात्र ठरवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाखाची मदत सुरु केली आहे.

135 प्रकरणे ठरविण्यात आली अपात्र..
मोताळा तालुक्यात 2001 ते 17 जुलै २०२२ पर्यंत एकूण 285 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी १४९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या वारसांना 1 लक्ष रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर १३५ प्रकरणे मात्र शेतकरी आत्महत्या नसल्याचे कारण सांगून शासनस्तरावरुन अपात्र ठरविण्यात आली आहे.

वडगाव येथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


मोताळा- सततची नापीकी व वाढती कर्जबाजारी यामुळे वडगाव (खं) येथील किशोर श्रीकांत शेळके या 43 वर्षीय शेतकऱ्याने स्व:ताच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 17 जुलै रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान घडली. सततची नापिकी व कर्जाचा वाढता बोजा, शेतीला लावलेला खर्च निघत नसल्यामुळे वेळेवर पेरणीची सोय न लागल्यामुळे त्यांना यावर्षी शेती दुसऱ्याला ठोक्याने द्यावी लागली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत 17 जुलै रोजी किशोर शेळके यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयाकडून सांगण्यात आले. मृतक किशोर शेळके यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँक शाखा मोताळा व ग्रामीण बँक शाखा मोताळाचे 2 लाखाचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!