बुलडाणा (✍️ राजेंद्र काळे ):- प्रतापगडाचे वारे.. नावाच्या वृत्तपत्राची आवृत्ती फार वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात यायची. ते आठवण्याचं कारण म्हणजे सध्या बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या पटलावर वाहत असलेले प्रतापगडचे वारे.. अर्थात वाहत असणाऱ्या या वाऱ्याची दिशा उध्दव ठाकरेंवर साधारणत: कोणतीही टिका न करता अतिशय संथपणे ती शिंदे गटाकडे वाहत असल्याचे, शिवसेना पदाधिकाऱ्यांना तर सोडाच सर्वसामान्यांनाही कळते!
मेहकर विधानसभा मतदार संघ, हा खा.प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला.. ‘प्रतापगड’ म्हणून तो राजकारणात ओळखला जातो. सध्या सोशल मिडियातीतही ‘अभेद्य प्रतापगड’ हा ट्रेंड आलायं शिवसेनेत, या फेसबुक पेजवर सध्या ‘तुम्हीच आमचे विठ्ठल..’ वा ‘तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण..’ तथा ‘आमचे इमान प्रतापगडासोबत..’ अशाही हॅशटॅगचा धुमाकूळ सुरु आहे. परवाच्या बैठकीततर एका समर्थकाने ‘तुम्हीच आमचे उध्दव ठाकरे..’ असे संबोधन केले. अर्थात हे सर्व का सुरु आहे? तर त्याला कारणीभूत एकनाथ शिंदेंचं बंड. आमदारांच्या बंडानंतर खासदारही थंड बसणार नाहीत, अशी अपेक्षा होतीच. ‘द्रोपदी’ला पाठिंब्यावरुन ‘मातोश्री’वर काहीतरी ‘महाभारत’ घडेल, असे वाटत असतांनाच, शिवसेना पक्षप्रमुखांनी मुर्मूला पाठिंबा जाहीर करत सध्यातरी खासदारांचे ‘बंड’ हे ‘थंड’ केलेले दिसते. अर्थात आता नव्या मुद्द्याच्या शोधात शिंदेसमर्थक खासदार असणार, हे सांगणे न लगे. अनेक खासदार तांत्रिकदृष्ट्या सेनेत असलेतरी, मानसिकदृष्ट्या शिंदे गटात असल्याचे त्यांच्या देहबोलीवरुन जाणवते.
प्रतापरावांचे काय? काय चालले त्यांच्या मनात, हे ते कोणाच्याही सांगत नाहीत. त्यांच्या भिंतीलाही कान नाहीत. दोन आमदार सुरतला निघून गेले तेव्हा, ते शेतात ‘पेरणी’ करत होते. त्यांचा २ संजूंशी संपर्क झाला नव्हता, बुलडाण्याचे आमदार संजुभाऊ तर म्हणे-त्यांना कोणतं सोयाबीनचं बी पेरण्याविषयी विचारलं होतं. पेरणी सुरुच होती, अर्थात राजकीय. पण चाड्यात कोणतं बी प्रतापरावांनी टाकलंय, हे तिफन हाकणाऱ्यालाही कळणार नाही, एवढं गुपीत. सांगतील मुगाचं, तर उगवणार उडीद!
खा.जाधव तसे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख. पण शिंदे गटाच्या बंडानंतर ते शिवसेनेच्या कितपत संपर्कात होते? ‘मातोश्री’वर त्यांचा संपर्क बैठकीततरी दिसला. बुलडाणा येथे त्यांनी बोलावलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात तेच अनुपस्थित राहिले, मोबाईलवरुन २ मिनिट संवाद साधला, पण सैनिकांनीच हुर्रे करुन टाकला. त्यानंतर त्यांनी मेहकरला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली, पण वेळेवर पुढे ढकलली. अखेर शुक्रवार १५ जुलै रोजी मेहकरात ‘वृंदावन’वर बैठक झाली. ३ तास चाललेली ही बैठक तशी ३/१३ वाजवणारी. प्रतापरावांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या, अनेकांनी उध्दव ठाकरेंसोबत राहुया.. अशा भावना मांडल्यानंतर विशेषत: प्रतापगडातील समर्थकांनी भाऊ बांधतील तेच तोरण, असे धोरण मांडले. एका तालुकाप्रमुखाने हिंदुत्वासाठी शिंदे गटात जाण्यापेक्षा थेट भाजपातच का जावू नये? असाही टोलाप्रश्न केला. सर्वांच्या भावना ऐकून घेतल्यावर खा.जाधव यांच्या भावना मात्र भावनिक मुद्द्यांना सोडूनच होत्या. भावनिक साथ ही तत्कालीन असते, ती उध्दव ठाकरेंसोबत सुध्दा किती दिवस राहील? असाही त्यांचा बोलण्याचा सूर होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकाची पाहिजे तेवढी कामे झाली नाही, मुख्यमंत्र्यांना २०० ते २५० पत्र दिली परंतु खासदारांच्या पत्राची दखल घेतल्या गेली नाही, आमदारांची नाराजी उध्दव ठाकरेंपर्यंत पोहोचवली होती.. एवढंच काय, बहुजनांना डावलल्याने भुजबळांचं बंड झाल्याच्याही त्यांच्या भावना होत्या. राणेंच्या बंडाचंही समर्थन होतं. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या बंडांचं त्यांनी थेटपणे समर्थन केलं नाही, परंतु एकूणच बोलण्याचा रोख हा उध्दव ठाकरेंच्या विरोधी वाटत होता. अर्थात हे बोलणं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतलं असल्यामुळं बाहेर आलं नाही, या बैठकीचे कुठे फोटोही नाहीत. तरीसुध्दा कोणीतरी गुपचूप केलेलं रेकॉर्डींग मातोश्रीपर्यंत पोहचल्याची चर्चा शिवसेना गटात आहे. या बैठकीला जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत व शांताराम दाणे उपस्थित होते, सहसंपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर व दत्ता पाटील तर महिला आघाडीच्या अध्यक्षा चंदाताई बढे व आशाताई झोरे उपस्थित होत्या. या सर्वांचा कल उध्दव ठाकरेंकडे झुकलेला होता, परंतु संपर्कप्रमुख असणारे खा.प्रतापराव जाधव यांचे मनोगत ठाकरेंच्या शिवसेनाविरोधात नसले तरी, त्याप्रती नाराजी व्यक्त करणारे होते. थेट शिंदे गटाचे समर्थन नव्हते, पण त्यावर टिकाही नव्हती. त्यामुळे या बैठकीवरुन वाटले ते,
*प्रतापगडाचे वारे..*
अर्थात शिंदे गटाकडे वाहणारे!
अलविदा..🙏
एकीकडे निष्ठेचा बाजार मांडल्या जात असतांना, दुसरीकडे निष्ठा काय असते? हे दाखवून देणारे २ निष्ठावान चेहरे हरवलेत. जनुभाऊ बोंद्रे व दुसरे श्यामराव गाभणे!_
आता जशी शिवसेनेची परिस्थिती आहे, त्याही पेक्षा भयंकर कठीण परिस्थिती काँग्रेसची असतांना चिखलीतून त्यावेळी बलाढ्य भारत बोंद्रे विरोधात एक साधा हेडमास्तर काँग्रेसकडून लढत जिंकून आला, ते जनुभाऊ बोंद्रे.
नेतृत्व किती साधं अन् कसं शिस्तशीर असावं? याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे जनुभाऊ. पक्षाकडून एकदाच आमदारकी मिळाली, अन् हा माणूस कायमचा पक्षाचाच होवून गेला. ६ ते ८ वेळा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे, त्या पक्षाची चिन्हं वेगळी दिसू लागली की त्याच पक्षावर आरोपांची सरबत्ती करुन कसे पळ काढतात? हे सध्या संपुर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे. अशावेळेस निष्ठा काय असते, याचं मुर्तीमंत उदाहरण असणारी माणसं ही अभावानेच बघायला मिळतात. त्यातले जनुभाऊ. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचं नाशिकला दु:खद निधन झालं.
पार्थीव मिरवण्याचा सोहळा साजरा न करता देहदान करण्याचा निर्णय जनुभाऊंनी जीवंतपणीच घेतला होता. १८ वर्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, १५ वर्ष भूविकास बँकेचे अध्यक्ष, समता एज्युकेशन सोसायटीची निर्मिती.. तरीही कायम निर्गवी राहणारे जनुभाऊ, त्याच साधेपणाने गेले.
_जिल्हा परिषद ज्यावेळी आमदार-खासदार यांचेपेक्षाही शक्तीशाली होती, त्याकाळात तब्बल ११ वर्ष कृषी तथा पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद ज्या व्यक्तीने भुषविले, ते दे.माळी या छोट्याशा गावातील श्यामराव गाभणे. हा माणूस तसा कमालीचा स्पष्ट होता, स्व.भास्करराव शिंगणे यांच्याशी निष्ठा ठेवून असणारे. १९८० ते १९९२ या काळात जिल्हा परिषद ही अविश्वासाने गाजत असतांनाच, या माणसावर नेतृत्वाचा मात्र विश्वास राहीला. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्द ज्या देऊळगाव माळी सर्वâलमधून सुरु झाली, त्यात श्यामरावजी गाभणे यांनी १९९२च्या निवडणुकीत दिलेला पाठींबा हा प्रतापरावांच्या विजयासाठी महत्वाचा ठरला होता. एकदा जिल्हा परिषदेचे पद गेल्यानंतर राजकीय मार्गदर्शकाच्या भूमिकेतच गाभणे मामा राहीले. महात्मा फुले शिक्षण संस्था त्यांनी उभारली, सामाजिक चळवळीत काम केले. ९१व्या वर्षी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. या दोन्ही नेत्यांना..
अलविदा 🙏