Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; २६ एप्रिल बुलढाणा, ७ मे सोलापूर-माढा, १३ मेरोजी अहमदनगरमध्ये मतदान!

– आजपासून देशात आचारसंहिता लागू; देशभरात सात टप्प्यांत मतदान

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – गेल्या काही दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची देशवासीय मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते, त्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग अखेर आज (दि.१६) दुपारी तीन वाजता देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी फुंकले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत, निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार आहे. या निवडणुकीत ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. निवडणुकांच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार असून, महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला, सोलापूर व माढा मतदारसंघासाठी ७ मेरोजी तर अहमदनगरमधील दोन्ही मतदारसंघासाठी १३ मेरोजी मतदान होणार आहे. देशातील पहिले मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. ४ जूनला देशात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मेरोजी मतदान होणार आहे. देशात सात टप्प्यांत निवडणूक घेताना, एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ जूनरोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकांसह चार राज्यांमधील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकादेखील होणार आहेत. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली आहेत, असा दावा आयोगाने केला आहे.

देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून, याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिले नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनरोजी जाहीर होईल. मतदानापासून निकालापर्यंत ४६ दिवस लागतील. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. ओडिशामध्ये १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. उर्वरित तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. अरुणाचल आणि सिक्कीममध्ये १९ एप्रिलला आणि आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.

देशात ७ टप्प्यात मतदान होणार

– पहिला टप्पा
मतदान – १९ एप्रिल
– दुसरा टप्पा
मतदान – २६ एप्रिल
– तिसरा टप्पा
मतदान – ७ मे
– चौथा टप्पा
मतदान – १३ मे
– पाचवा टप्पा
मतदान – २० मे
– सहावा टप्पा
मतदान २५ मे
– सातवा टप्पा
मतदान १ जून


महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे?

  •  पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  •  दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  •  तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  •  चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  •  पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, व मुंबईतील सहा मतदारसंघ

देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. देशातील ९७.८ कोटी मतदारांपैकी ४९.७ कोटी पुरुष तर ४७.१ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, ४८ हजार तृतीयपंथी मतदान करतील. त्यासाठी, ५५ लाख ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगून, मसल्स पॉवर, मनी पॉवर आणि मिस इन्फॉरमेशन या गोष्टींचे आपल्यापुढे आव्हान आहे. त्यावर, मात करण्यासाठीही निवडणूक आयोगाने यंत्रणा उभारली आहे. तसेच, हिंसामुक्त आणि गैरव्यवहारविरहीत निवडणुका राबविणे हे प्राधान्य असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. गत, २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, ३७० पार’चा नारा भाजपने ाfदला आहे. तर, एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांनीही भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीची वङ्कामूठ बांधली आहे. देशवासीयांचा कौल यंदा संमिश्र मिळण्याची शक्यता असल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

तक्रार मिळताच १०० मिनिटांत पथक घटनास्थळी पोहोचेल!

कुठे पैसे किंवा भेटवस्तू वाटल्या जात आहेत याची तक्रार सी-व्हिजिल अ‍ॅपमध्ये कोणाला करायची असल्यास फक्त एक फोटो घ्या आणि आम्हाला पाठवा. तुम्ही कुठे उभे आहात ते आम्हाला कळेल. १०० मिनिटांत त्यांची टीम पाठवून तक्रारीचे निराकरण करेल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सामान्य मतदारांना सूचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!