बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळे आहेत. शालेय सहलीच्या माध्यमातून ही पर्यटनस्थळे सर्वसामान्य नागरिकांना परिचित होण्यास मदत होणार आहे. तसेच या सहली पर्यटनवाढीस मदत करणाऱ्या ठरणार असल्याने सर्व शैक्षणिक संस्थांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्राधान्याने सहली आयोजित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात जागतिक स्तरावरील खाऱ्यापाण्याचे लोणार सरोवर, राजमाता मॉ जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा, ज्ञानगंगा अभयारण्यात पलढग, माटरगाव बोट, जंगल सफारी, अंबाबरवा अभयारण्य जंगल सफारी, सातपुडा पर्वत, वारी हनुमान मंदिर, 105 फुट उंच हनुमान मुर्ती असलेले नांदूरा, संत श्री गजानन महाराज मंदिर शेगाव आणि नागझरी, हिवरा आश्रम येथील विवेकानंद गार्डन व बोट सफारी, तसेच बुलडाणा शहरातील बालाजी मंदिर येथील अम्युझमेंट पार्क व श्री स्वयं प्रकाशबाबा गिरडा येथील ध्यान मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जिल्ह्यातील या स्थळांची सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक व पर्यावरण आदीबाबत व्यापक प्रमाणात माहिती व जनजागृती होणे शक्य आहे. तसेच सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. पर्यटन विकासासाठीजिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे टूरिझम सर्किट तयार करुन सर्व शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भाग म्हणून याठिकाणी सहलीचे आयोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांसाठी सहली आयोजित कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार; उद्योग केंद्रात मैत्री कक्षाचे उद्घाटन
जिल्ह्यात विविधांगी पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटन ठिकाणी योग्य सुविधा मिळाल्यास जिल्ह्यात पर्यटन उद्योगास चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्रातील मैत्री कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजक राधेश्याम चांडक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.
सिंदखेडराजा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातील विकासकामांसाठी 260 कोटी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी वीजेची कामे करण्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच जिजाऊसृष्टी येथे अत्यावश्यक सुविधांसाठी 50 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. लोणारसाठी 370 कोटी मंजूर करण्यात आले आहे. लोणार सरोवराला वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्व असल्याने यातून उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने लोणार येथे संशोधनासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करण्यात येतील. जिल्ह्यातील औद्योगिक परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. खामगाव येथे 170 हेक्टर, मोताळा,, देऊळगाव येथे नव्याने जागा एमआयडीसीसाठी घेण्यात येणार आहे. उद्योजकांनी येणाऱ्या अडचणी एकत्रितरित्या सादर कराव्यात. यावर करण्यात येणाऱ्या उपायययोजनाही सूचवाव्यात. उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली.