चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील गौैणखनिज तस्करांना चाप लावण्याचे काम तहसीलदार संतोष काकडे यांनी जोरदारपणे सुरू केले असून, आठवडाभरात त्यांनी अवैधरित्या गौण खनिज उत्खनाच्या वेगवेगळ्या प्रकरणात संबंधितांवर तब्बल ४ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचे दंड ठोठावला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. तर यापुढेही अवैधरित्या गौण खनिजाच्या प्रकरणात गय केली जाणार नाही, अशी आपली ठाम भूमिका असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार संतोष काकडे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
चिखली तालुक्यातील मौजे भोकर येथील सरकारी ई क्लास गट नं. १७९ मध्ये प्रशासनाला जवळपास १ हजार ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आले होते, तर सदरचे उत्खनन सुपरवायझर रानुबा सखाराम जाधव यांनी केल्याचे चौकशीत समजले. तर उत्खनन केलेल्या मुरमापैकी अंदाजे ३०० ते ३५० ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे प्रशासनास निदर्शनास आले होते. या प्रकरणात एस. आर. एल. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. आदर्श नगर, चिखली रोड, जाप्रâाबाद जि. जालना यांनी अवैधरित्या ८५० ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याने त्यांचेवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार एकूण ७५० ब्रास मुरूम करिता प्रतिब्रास रुपये ३ हजार बाजार मूल्याप्रमाणे होणारे एकूण किंमत २५ लाख ५० हजारच्या पाचपट दंड ०१ कोटी २७ लाख ५० हजार अधिक ८५० ब्रास मुरमा करता रॉयल्टी प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे ०५ लाख १० हजार असा एकूण दंड ०१ कोटी ३२ लाख ७ हजार रुपये असा दंड आकारण्यात आला आहे, तर सात दिवसाच्याआत दंडात्मक रकमेचा चलानद्वारे शासनखाती भरण्यात यावा, असेसुद्धा तहसीलदार चिखली यांनी दिनांक ६ मार्च २०२४ च्या आदेशात म्हटले आहे.
दुसर्या प्रकरणात, मौजे चिखली येथील भाग १ मधील शेत सर्व्हे नंबर ०६ मधील रेहान पार्क नावाच्या लेआऊटमधील अवैध १८०० ब्रास मुरूम / खप्पर बाबत ३ हजार रुपये प्रति ब्रास मूल्याप्रमाणे होणारी एकूण रक्कम ५४ लाख व त्याच्या पाचपट दंड ०२ कोटी ७० लाख व १८०० ब्रास मुरूम खप्परकरिता रॉयल्टी १० लाख ८० हजार असा एकूण ०२ कोटी ८० लाख ८० हजाराचा दंड दिनांक १३ मार्च २०२४ रोजी तहसीलदार चिखली यांनी आकारला आहे. तर दोन्ही प्रकरण मिळून ४ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आले आहे. तहसीलदारांच्या या आक्रमक भूमिकेने गौणखनिजाची चोरी करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
———-