तळपत्या उन्हापासून बालगोपाळांना दिलासा; अखेर अंगणवाडीची वेळ बदलली!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची जिल्हा परिषद प्रशासनाकड़ून गंभीर दखल
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अंगणवाड़ी भरवण्याची वेळ आता सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान करण्यात आली आहे. यामुळे तळपत्या उन्हापासून चिमुकल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सड़ेतोड़ व सविस्तर वृत्त प्रसारित करून याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत दि.१३ मार्चरोजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एंड़ोले यांनी संबंधित सीड़ीपोओ यांना आदेश काढले आहेत.
मानधनात भरीव वाढ करावी, पेन्शन योजना लागू करावी, चतुर्थश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यासाठी राज्यातील दोन लाखाच्यावर अंगणवाड़ी व मदतनीस यांनी गेल्या ड़िसेंबर व जानेवारीत दीड़ महिना संप केला होता, तर जिल्हास्तरावरही विविध संघटनांनी आंदोलन केले होते. पण शासनाने यांची कोणतीही दखल न घेता उलट संपकाळातील मानधन कापले. संपाचा राग मनात धरून की काय, अचानक शासनाने अंगणवाड़ी भरवण्याची वेळ आठ ते बाराऐवजी सकाळी दहा ते दुपारी दोन अशी करण्यात आली होती. उन्हाचा पारा वाढतच असल्याने याचा त्रास मात्र चिमुकल्यांना होत आहे.
याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने काही दिवसापूर्वीच सविस्तर सड़ेतोड़ व सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. त्याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली. उन्हाळ्याचे दिवस पाहता, आता अंगणवाड़ी भरवण्याची वेळ सुट्टीचे दिवस वगळता सकाळी आठ ते बारा अशी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाड़े यांच्या संमतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण एंड़ोले यांनी संबंधित सीड़ीपोओ यांना दि.१३ मार्च रोजी काढला आहे. याबाबत सीड़ीपोओ मेहकरसह इतरांनी याची त्वरित अंमलबजावणीदेखील केली आहे. असे असले तरी अंगणवाड़ी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांबाबत अद्याप शासनाने मात्र सकारात्मक पावले उचलल्याचे सध्यातरी दिसत नाही. त्याबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
————