Breaking newsHead linesMaharashtraWorld update

उद्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार; दुपारून आचारसंहिता लागू होणार!

– २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ९७ कोटी मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – सर्वांच्या नजरा लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) दुपारी ३ वाजता वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी ३ वाजता होणार असून, या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होईल. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. आयोगाची पत्रकार परिषद सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल ९७ कोटी मतदार उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत.

Imageगेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात वेगवान घडामोडी घडत आहेत. कालच दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या नवीन निवडणूक आयुक्तांनी लगेचच पदभार स्वीकारला. त्यानुसार, आज (दि.१५) आयोगाच्या तिन्ही अधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्या म्हणजेच शनिवार, १६ मार्चरोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्याचे निश्चित झाले. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ९७ कोटी लोक मतदान करू शकतील. ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती २०२४ अहवाल प्रसिद्ध केला होता. आयोगाने सांगितले की, १८ ते २९ वयोगटातील २ कोटी नवीन मतदार मतदानात सामील झाले आहेत. यादी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे ९६.८८ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तरदेखील २०२३ मध्ये ९४० वरून २०२४ मध्ये ९४८ पर्यंत वाढले आहे.


८५च्या वयोगटातील ज्येष्ठांना घरबसल्या मतदानाची संधी!

निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर सरकारने शुक्रवारी (१ मार्च) वृद्ध मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याच्या निवडणूक नियमात बदल केला आहे. आता फक्त ८५ वर्षांवरील वृद्ध मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. आतापर्यंत ८० वर्षांवरील लोक या सुविधेसाठी पात्र होते. कायदा मंत्रालयाने राजपत्र अधिसूचनेत म्हटले आहे की, ८५ वर्षे ओलांडलेल्या मतदारांना ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आचार नियम १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!