लोकसभेसाठी रविकांत तुपकरांची मजबूत मोर्चेबांधणी; विरोधात कुणीही उभे राहिले तरी गुलाल उधाळणार!
– चिखलीतील बैठकीतून ‘निर्धार परिवर्तन अभियानाची घोषणा’
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली येथील मौनीबाबा संस्थानात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या घाटावरील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला कार्यकर्ते- पदाधिकार्यांनी गर्दी केली होती. यावेळी रविकांत तुपकरांनी ‘निर्धार परिवर्तन अभियाना’ची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत ७ मार्चपासून पुढील सात दिवस तुपकरांचे शिलेदार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून गावातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तुपकरांनी लोकसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, विरोधात कुणीही उभे राहिले तरी गुलाल तर रवीभाऊच उधळतील, अशी ग्वाही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते देत आहेत. दरम्यान, एका राष्ट्रीय पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन असल्याची बाब निदर्शनास आली असून, या सर्वेक्षणानुसार, लोकसभा निवडणुकीत तुपकर हे विजयी होण्याची शक्यता तब्बल ६९ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे, अशी माहिती या पक्षाच्या विश्वासनीय सूत्राने दिली आहे.
चिखली येथील मौनीबाबा संस्थानात आज झालेल्या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या तसेच त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. लोकसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काय योजना आहेत, याबाबत देखील चर्चा करण्यात आली. रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला घाटाखाली व घाटावरील चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, आता पुढील काही दिवसात ही यात्रा मोताळा, बुलढाणा व मेहकर तालुक्यात जाणार आहे. त्या दरम्यान आज रविकांत तुपकरांनी शिलेदारांचे ‘निर्धार परिवर्तन अभियान’ हाती घेण्याचा निर्णय या बैठकी घोषित केला. ७ मार्चपासून हे अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत पुढील सात दिवस रविकांत तुपकर यांचे शिलेदार प्रत्येक गावात पोहोचणार आहेत. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील, तसेच येणार्या लोकसभेत परिवर्तनाचा निर्धार या अभियानात केला जाणार आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने विविध टीम तयार करण्यात आल्या असून, या अभियानाच्या संपूर्ण नियोजन या बैठकीत पार पडले.
यावेळी बोलतांना तुपकर म्हणाले की, माझ्याकडे कमिशनचा पैसा नाही, कोणताच दोन नंबरचा पैसा नाही. पण माझ्याकडे गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहेत आणि हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीच्या जोरावरच ‘एक नोट एक वोट’ या तत्त्वानुसार आपण लोकसभेची निवडणूक लढविणार आणि परिवर्तन करणार आहोत. आता वारं फिरलं आहे, गावातील जनता आणि तरुण पेटून उठले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आपल्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे आता विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवतील, खोट्या-नाट्या बातम्या पसरवतील त्यामुळे सर्वप्रथम कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, जागरूक राहावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. गेल्या २२ वर्षात आपण केवळ चळवळीला वाहून घेतले आहे. आपण कधीच काही मागितले नाही, आता ‘एक नोट एक वोट’ या नुसार जिल्ह्यात परिवर्तन घडविण्याचा निर्धार आपण केला आहे, असेदेखील तुपकरांनी यावेळी सांगितले. तर तुमचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. तन-मन-धनाने तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली तसेच जिल्ह्यात निर्धार परिवर्तन अभियान यशस्वी करण्याची शपथ यावेळी घेतली.
भाऊ आता ही लढाई आमची..!
भाऊ तुम्ही गेली २२ वर्ष घरादारावर तुळशीपत्र ठेवून केवळ सर्वसामान्य जनतेसाठी लढा देत आहात. अनेक केसेस तुम्ही अंगावर घेतल्या, पोलिसांचा लाठीमार सहन केला तुरुंगवास भोगला, तडीपारी सहन केली..अनेक संकटे तुमच्यावर आली..पण जीवाची परवा न करता तुम्ही शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्यांसाठी तरुणांसाठी आंदोलने केली. या सर्व मोबदल्यात तुम्ही कधीच काही मागितले नाही. त्यामुळे आता तुमच्या पदरात मतांचे दान टाकून जिल्ह्यात परिवर्तन घडविणे ही आमची जबाबदारी आहे. आता ही लढाई तुमची नाही तर ही लढाई आमची आहे आणि आमची लढाई आम्ही जिंकणारच असा निर्धार यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यांत उत्स्फुर्त स्वागत; मध्यरात्रीही सभेला जोरदार गर्दी!
दरम्यान, काल स्वराज्यजननी राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव, नशिराबाद, आंचली, नाईकनगर, डावरगाव, वसंतनगर, दत्तापुर, धांदरवाडी, भोसा, सेलू, वर्दडी, बुट्टा, धानोरा, देवखेड, चांगेफळ, रुम्हणा, महारखेड या गावांमध्ये पोहोचली होती. यावेळी तुपकरांनी गावकर्यांशी संवाद साधला. ठीकठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रेमाने यात्रेचे जोरदार स्वागत केले. सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात मध्यरात्री झाली. मात्र मध्यरात्रीही महारखेड येथे झालेल्या सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. तसेच, निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून ३ मार्चरोजी देऊळगावराजा तालुक्यातील टाकरखेड भागीले, पांगरी, सिनगाव जहाँगिर, गारगुंडी, मेहूणाराजा, रोहणा, निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगाव, निमगाव वायाळ, वाघजई, जळगाव, पिंपळगाव, गोंधनखेड, आळंद या ठिकाणी तुपकरांनी गावकर्यांशी संवाद साधला होता. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागात शेडनेट व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकर्यांना धीर दिला. तसेच अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल होवून रोहणा येथील शेतकरी स्व.विठ्ठल जनार्दन डोके यांनी आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना मदत मिळणेसंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली.
————-