– पूर्णवेळ बीडीओअभावी शासकीय योजनांना खीळ बसल्याची तक्रार दाखल
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी (बीडीओ) नसल्याने विविध शासकीय योजनांना खीळ बसली आहे. चिखली हा मोठा तालुका असून, येथे तातडीने पूर्णवेळ गटविकास अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी चिखली तालुका सरपंच संघटनेने अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांच्या नेतृत्वात विविध गावांच्या सरपंचांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदनाद्वारे केली आहे. लवकरच चिखलीत पूर्णवेळ बीडीओ देऊ, अशी ग्वाही सीईओ नरवाडे यांनी संघटनेला दिली आहे.
सरपंच संघटनेच्या निवेदनात नमूद आहे, की चिखली हा मोठा तालुका असून, चिखली पंचायत समिती अंतर्गत १४४ गावे व ९९ ग्रामपंचायती येतात. त्यामुळे चिखली पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने गावखेड्यातील विविध योजना व विकासकामांना खीळ बसली आहे. या पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामे ही कासवगतीने सुरू असून, ग्रामीण भागाच्या विकासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पंचायत समितीचा पदभार सद्या प्रभारी असून, त्यांच्याकडे जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांचा पदभार आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्याला चिखलीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. तसेच, अनेक योजनांपासून ग्रामस्थ वंचित राहात आहेत. तरी, चिखली पंचायत समितीला लवकरात लवकर गटविकास अधिकारी देण्यात यावा, अशी मागणीही चिखली तालुका सरपंच संघटनेच्यावतीने अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांंच्यासह सरपंचांनी केली आहे. याप्रसंगी सरपंच रवींद्र डाळीमकर (कव्हाळा), सौ. कासाबाई रामभाऊ जाधव (हातणी), प्रदीप सोळंकी (पाटोदा), चेतन म्हस्के (पांढरदेव), सौ. ज्योती गाडेकर (मुरादपूर), तात्याराव झाल्टे (रानअंत्री) आदी सरपंचांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चिखली पंचायत समितीला पूर्णवेळ बीडीओ नसल्याने ग्रामपंचायतींची अनेक कामे पेंडिंग पडली आहेत. शासकीय योजनांबाबत तातडीने हालचाली होत नाहीत. चिखली पंचायत समितीचा कारभार ढेपाळला आहे. त्यामुळे चिखली येथे तातडीने बीडीओ देण्यात यावा, अशी मागणी आम्ही सीईओ नरवाडे यांच्याकडे केली आहे. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमची मागणी मान्य त्वरित न झाल्यास शासन दरबारी आम्ही संघर्ष करू.
– सतीश पाटील भुतेकर, अध्यक्ष चिखली तालुका सरपंच संघटना
——–