– पीकविमा कंपनीच्या चुकीमुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यासह जिल्ह्यात मागील आठवड्यात पाऊस व गारपीट झाली. यामधे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे हरभरा सोंगून पडलेल्या अवस्थेत असतांना तर गहू, फळबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत ज्या शेतकर्यांनी पीकविमा काढला, अशा अंदाजे सात ते आठ हजार शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या. परंतु अद्यापर्यंत पीकविमा कंपनीकडून सर्व्हे यादीच प्राप्त झालेली नसल्याने शेतकरी पंचनामे होण्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकर्यांचे पंचनामे झाले नसल्याने शेततकी संतप्त होत, जे काय पीक वाचले ते घरी आणले तर काहींनी बेभाव विकले. आता काय पीकविमा कंपनी ढेकळांचे पंचनामे करणार का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी पीकविमा कंपनीस केला आहे. तर आता तातडीने पीकविमा रक्कम अदा करा, अशी मागणीही सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे.
मागील वर्षी सन २०२२ मध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची रक्कम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांंच्या मुंबई येथील आंदोलनापासून मंजूर आहे, ती रक्कम शासनाने ऐनवेळी लादलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे अडकून पडली आहे. तर अनेकांचे अजून व्हीके नंबर प्राप्त नाहीत, तर अनेकांची नावेच काही तलाठ्यांनी यादीत समावेश केला नसल्याने ते शेतकरी सोयाबीन नुकसान भरपाई मिळणेपासून वंचित राहिले आहेत. त्यानंतर शासनाने आता हरभरा अनुदानसुद्धा देऊ केले परंतु ती रक्कमसुद्धा अडकून पडली आहे. असे असतांना आता परत मागील आठवड्यात ऐन हरभरा सोंगून पडलेला असतांना पाऊस व गारपीट झाली. त्यातही तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत ज्या शेतकर्यांनी एका रुपयात पीकविमा काढला, त्यांनी ऑनलाईन तक्रारीसुद्धा केल्या परंतु आठवडा उलटला तरी पीकविमा प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावणार्या विमा कंपनीकडून लॉक आयडी न आल्याने व सर्व्हे यादीच कंपनीकडून प्राप्त नसल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा पीकविमा कंपनीकडून पंचनामेच झाली नसल्याची बाब समोर आली आहे. तर शेतकर्यांच्याप्रश्नी शासनाकर्ते व कंपनी गंभीर नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केला आहे.
अद्यापपर्यंत पीकविमा कंपनीकडून पंचनामे झाले नाही, अनेकवेळा शेतकरी कृषी विभागाकडे चकरा मारतात. परंतु या बाबत विमा कंपनी महत्वाचा दुवा आहे. काही शेतकर्यांचे पीक उभे असले तरी अनेक शेतकर्यांनी जे थोडेबहुत पीक वाचले होते ते घरी नेऊन साठवले. काहींनी सुड्या लावल्या तर अनेकांनी हरभरा पीक बेभाव विकून टाकले, आता पीकविमा कंपनी बघायलाच आली नसल्याने शेतकरी पीक शेतात ठेवणार तरी किती दिवस? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. तर या प्रकरणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, गारपिटीने नुकसान झालेल्या व तक्रारी नोंदवलेल्या शेतकर्यांची तातडीने पीकविमा रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी केली असून, आता का शेतात ढेकळांचे पंचनामे करणार का? असा संतप्त सवालदेखील सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. तर चूक पीकविमा कंपनीची असतांना शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रकार झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील सरनाईक यांनी दिला आहे.