Breaking newsHead linesMaharashtraNagpurPolitical NewsPoliticsVidharbha

‘मविआ’सोबत लढलो तर ४० जागा; स्वतंत्र लढलो तर ६ जागा जिंकणार : आंबेडकर

– जागावाटपाचा तिढा ६ तारखेपर्यंत सुटला तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याची आंबेडकरांची तयारी

नागपूर (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडीला जागांसह मसुदा दिला होता. या मसुद्याबाबत अद्याप महाविकास आघाडीने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे याबाबत ‘मविआ’ काय निर्णय घेते? त्यावरच आता सर्व अवलंबून आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत, आम्ही ‘मविआ’सोबत लढलो तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि आम्ही स्वतंत्र लढलो तर सहा जागा निश्चित जिंकू, असा दावाही आंबेडकर यांनी केला. राज्यात वंचित बहुजन आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत आहे. ‘मी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र माझ्याव्यतिरिक्त ‘वंचित’कडून अन्य कोणत्याही उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही,’ असा खुलासाही त्यांनी केला. वंचित आघाडीने अकोल्यासह वर्धा आणि सांगलीसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याचे बोलले जात होते, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

रविवार, दि.३ मार्चरोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही आघाडी समोर काही मुद्दे मांडले. ४८ जागांपैकी १५ जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा. (सर्व घटक पक्ष मिळून) तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे द्यावेत. तसेच आघाडीतील काही घटक पक्षाचा इतिहास लक्षात घेता, सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी यापुढे आम्ही भाजपसोबत युती करणार नाही, असे आश्वासित करावे. सेक्युलर मतदाराचे मत सेक्युलर पक्षालाच जाईल, याची शाश्वती मतदाराला द्यावी लागेल. याबाबतचा लेखी मसुदा जाहीर करावा, अशी भूमिका स्पष्ट करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, की आता महाविकास आघाडी काय भूमिका घेते? याकडे आमचे लक्ष लागले आहे. सकाळी केलेल्या ट्वीटबाबत ते म्हणाले, अद्याप काहीही ठरलेले नसल्याने इतर पक्षाच्या बैठकीला कार्यकर्त्यांनी जावू नये. कारण कार्यकर्ते उत्साही असतात. त्यामुळे डोकेदुखी वाढते, यामुळेच हे ट्वीट केले, असेही ते म्हणाले.
अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागावाटप निश्चित झालेले नाही. काँग्रेस आणि शिवसेनेचे १५ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात ९ जागांचा गुंता सुटलेला नाही. हा गुंता ६ मार्चपर्यंत सुटला तर ठीकच आहे. अन्यथा त्यानंतर भूमिका स्पष्ट करु. आम्ही मविआसोबत लढलो तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि आम्ही स्वतंत्र लढलो तर सहा जागा निश्चित जिंकू, असा दावा करुन आंबेडकर म्हणाले, राज्यात वंचित बहुजन आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत आहे. कारण यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप-सेना सोबत लढले. भाजपने २३ जागा लढल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस २००४ पासून एकत्र लढले आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात जो पक्ष कधी लढलाच नाही, त्या पक्षाची ताकद त्या जागेवर कमी आहे, हे सत्य लक्षात घेवूनच जागावाटप होणे गरजेचे आहे. मात्र आमचा शेवटपर्यंत मविआ सोबत राहण्याचा प्रयत्न असेल, मात्र तूर्तास आम्ही आघाडीचे निमंत्रक आहोत की घटक याबाबत आम्हीही संभ्रमी असल्याचेही अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कमिटीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मला पत्र लिहीत एका उमेदवाराचे नाव सूचवले आणि या जागेसाठी आपण महाविकास आघाडीत आग्रह धरावा, अशी विनंती जिल्हा कमिटीने केली आहे. मात्र जिल्हा कमिटीला उमेदवार ठरवण्याचे किंवा जाहीर करण्याचे अधिकार नाहीत. त्यांनी फक्त नाव सूचवले आहे,’ अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसेच सांगलीबाबत आम्ही आमची भूमिका ८ मार्चरोजी जाहीर करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, ‘महाविकास आघाडी व्हावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. मात्र महाविकास आघाडी न झाल्यास राज्यात भाजपविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल,’ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


शरद पवारांसोबत ६ तारखेला बैठक

येत्या ६ मार्चरोजी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी भेटीचे निमंत्रण दिले आहे. अद्याप स्थळ निश्चित झालेले नाही. मात्र त्यांच्या सोबत बैठकीला मी जाणार आहे, अशी माहितीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.


महादेव जानकरांसाठी शरद पवार माढ्याची जागा सोडणार!

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधार्‍यांच्या महायुतीला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीत आणखी मित्रपक्ष जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आता शरद पवार यांच्याकडून या दोन्ही नेत्यांना थेट ऑफर देण्यात आल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या कोट्यातून वंचित आघाडीला ४ ते ५ जागा आणि महादेव जानकर यांच्या रासपला शरद पवार हे आपल्या पक्षाच्या कोट्यातून माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे. हे दोन्ही पक्ष सोबत आल्यास लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंग साधणे महाविकास आघाडीला शक्य होणार आहे. यादृष्टीनेच शरद पवार यांचा प्रयत्न सुरू असून, पुढील काही दिवसांत प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर या दोन्ही नेत्यांसोबत शरद पवार हे याबाबत प्रत्यक्ष भेटीत अंतिम चर्चा करतील, अशी शक्यता आहे. माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी शरद पवारांकडून दाखवण्यात आल्यानंतर महादेव जानकर यांनी पवार यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. माढ्याची जागा सोडण्याची तयारी दाखवल्याबद्दल आम्ही शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष आम्हाला कोणती जागा देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!