Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPolitics

फडणवीस ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येताच जरांगे पाटील ‘बॅकफूट’वर!

– तीन जिल्ह्यांत इंटरनेट बंद, अंतरवली सराटीत प्रचंड फौजफाटा तैनात, अंबड तालुक्यात संचारबंदी
– जरांगे पाटलांकडून उपोषण आंदोलन स्थगितची घोषणा, साखळी उपोषण सुरू ठेवणार, पुन्हा राज्यभर दौरे करणार
– फडणवीसांवरील एकेरी भाषेतील टीका सरकारला झोंबली, मराठा आंदोलन भरकटल्याने भाजपही आक्रमक

जालना/मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन भरकटले की काय, अशी स्थिती निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. फडणवीस यांचे गृहमंत्रालय कामाला लागले असून, जरांगे पाटलांची प्रचंड कोंडी केली गेली आहे. जालना, बीड जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जरांगेभोवती प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सरकारचा आक्रमकपणा पाहून मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील पुन्हा गावात परतले. गावात येताच त्यांनी आपले उपोषण आंदोलन स्थगित केले, तसेच वैद्यकीय उपचार घेण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी खुद्द जरांगे पाटलांसह आतापर्यंत १०४१ जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यात सर्वाधिक ४२५ गुन्हे हे मराठवाड्यात दाखल झालेले आहेत. शिवाय, जरांगे पाटलांचे सहकारी गजाआड केले जात असून, आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनाच्या रणनीतीत महत्वाची भूमिका बजावणारे श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान, विविध राजकीय नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध पाहाता, मनोज जरांगे पाटलांनी तूर्तास दोन पावले मागे घेत, मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, त्यांच्या सहकार्‍यांची धरपकड सुरू झाली असून, रविवारी रात्री पोलिसांनी एकूण पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणार्‍या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांचाही त्यात समावेश आहे. जालना जिल्हाधिकार्‍यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे हे आज सकाळी भांबेरी गावातून अंतरवाली सराटीमध्ये परतले. यावेळी त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढची रणनीती काय असेल हे मी ठरवेन. पुढील चार दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा जाहीर करेन. संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. मीच तिकडे जाणार आहे. त्यामुळे लोक सैरभैर झालेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करत आहे. मी आता गावागावत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मुलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.

१०४१ जणांवर गुन्हे दाखल

कालपासून राज्य सरकारकडून जवळपास १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ४२५ गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. तर बीड जिल्ह्यातील शिरुर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. आपण मराठा समाजाच्या पाठिशी आहोत, ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळला पाहिजे. भाजप मराठा समाजाच्या पाठिशी राहणार आहे. यापूर्वीही भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आतादेखील नव्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, हा विश्वास लोकांना द्या, अशी सूचना भाजप आमदारांना करण्यात आली आहे. तसेच या बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या, असेही भाजप आमदारांना सांगण्यात आले आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!