BULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

सोमठाण्यातील विषबाधेने आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली; आता उच्च न्यायालयानेही घेतली दखल; सरकारला नोटीस जारी!

– काही दुर्देवी प्रकार घडला असता तर काय केलं असतं? न्यायालयाने सरकारला केली विचारणा!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगरीतून झालेली विषबाधा व त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येऊन आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली असतानाच, या धक्कादायक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकादेखील झाली आहे. चक्क रस्त्यावर झोपवून, आणि दोरीला सलाईन बांधून तब्बल २०० ग्रामस्थांवर उपचार करण्यात आले होते. या धक्कादायक प्रकाराची न्यायालयाने दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावत विचारणा केली आहे. विशेष बाब अशी, या दुर्देवी घटनेचे सर्वात प्रथम वृत्त प्रकाशित करून, राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष या घटनेकडे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेधले होते.

सोमठाणा येथील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरावरील धार्मिक कार्यक्रमात वाटण्यात आलेल्या भगर आणि आमटीच्या प्रसादात जवळपास दोनशे ग्रामस्थांना विषबाधा झाली होती. यावेळी जवळच असलेल्या बिबी ग्रामीण रुग्णालयात अचानक २००च्यावर रुग्ण आल्याने रुग्णालयाची क्षमता अपूर्ण पडली, तसेच तेथील वैद्यकीय अधिकारीदेखील गैरहजर होते. ३० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अचानक २०० ते २५० पेशंट आल्याने अनेक रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून रात्रीच्या वेळी उपचार करण्यात आले. त्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाने खासगी डॉक्टरांना पाचारण केले होते. या सर्व धक्कादायक घटनेची माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केली होती, तसेच या घटनेचा व्हिडिओ माध्यमात प्रसारित झाल्यानंतर मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडिओ दाखवले. याबाबत न्यायालयाने या घटनेबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. विषबाधेसारख्या गंभीर प्रकारात राज्य सरकारची रुग्णालये रुग्णांवर रुग्णालय बाहेर रस्त्यात कसे उपचार करू शकतात?, याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला विचारणा करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी मात्र एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा चिंताजनक झाली असती तर काय केले असते, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे आता यावर सरकार कोणते उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
विशेष बाब अशी, की इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडली होती. परिसरात असलेल्या सर्वच आरोग्य केंद्रात या रुग्णांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील जागा आणि डॉक्टर्स अपूर्ण पडत असल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचे पथक बोलवण्यात आले होते. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना जमिनीवरच झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नसल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती. यामुळे गावकर्‍यांमध्ये संताप पाहायला मिळाला होता.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!