Breaking newsHead linesMaharashtraPoliticsWorld update

राज्य सरकारने कोंडी करताच, जरांगे पाटील माघारी फिरले!

– सरकार आक्रमक झाल्याने मुंबईला जाण्याचा प्लॅन रद्द करून जरांगे पाटील अंतरवली सराटीत परतले!

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर, पुढील आंदोलन फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यासमोर करणार असल्याचे जाहीर करून मुंबईकडे कूच केली होती. जरांगे पाटलांच्या या आक्रमक भूमिकेनंतर एरवी मवाळ भूमिका घेणार्‍या राज्य सरकारनेदेखील आक्रमक भूमिका घेत, जरांगे पाटलांची कोंडी केली. संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करून, जरांगे पाटलांना भांबेरी गावातच कोंडीत पकडले. तसेच, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचीही धरपकड सुरू केली. सरकार आक्रमक झाल्याचे पाहून जरांगे पाटलांनीही दोन पाऊले मागे येत, पुन्हा अंतरवली सराटीकडे परतण्याचे ठरवले व अंतरवली सराटी गाव गाठले. आता तेथे ते समाज बांधवांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, तीर्थपुरी येथे एक एसटी बस जाळण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काहींची धरपकड सुरू केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मागील वेळेस मराठा आंदोलनाच्या काळात बीड आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ही अधिक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. 

ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सहकार्‍यांची पोलिस धरपकड करत आहेत. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्‍यांसह एकूण ५ लोकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, जरांगे पाटील हे काल मुंबईकडे निघाल्यानंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मध्यरात्री एक वाजल्यापासून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. याचा विरोध म्हणून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवलीत जाण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री भांबेरी गावात तळ ठोकला होता. त्यानंतर भांबेरी गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, की ‘संचारबंदी लागू करण्यासाठी काय झालंय? आता आम्हाला जावू द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीसांना यांच्या आडून लपायचं आहे का? देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीचा फोटो टाकला होता. हा प्रयोग ते रात्रीच करणार होते. सगळ्यांना एक विनंती आहे, की पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे की त्यांच्यात दम नाही. ते पोलिसांच्या आडूनच करणार आहेत. एक ते दोन तासांत निर्णय घेऊ. मी त्यांच्याकडे बघणार आहे तुम्ही शांत राहा. संचारबंदी लावली तरी देवेंद्र फडणवीसांना सग्यासोयर्‍यांची अंमलबजावणी करावीच लागणार. याचा परिणाम सगळ्या जातीधर्मात होणार आहे. तुझ्याविषयी प्रचंड नाराजीची लाट उसळणार आहे. याचा एवढा पश्चाताप होणार आहे. आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्याआज सग्यासोयर्‍यांची अंमलबजावणी करावी. कारण जिल्हाधिकारी तुमच्याशिवाय संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आपल्याला विचार करुन पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे,’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच, ‘महिलांना खरचटले जरी असते तर हे राज्य पेटले असते. देवेंद्र फडणवीस १०० टक्के महिलांवार हात उचलायला लावणार होते. पण मी आंदोलन चालवत आहे उगाच यशस्वी झालेलो नाही. तुझे डाव ओळखून आहे. आतापर्यंत घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले,’ अशी टीकाही जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केली.


मनोज जरांगे पाटील माघारी अंतरवलीत परतले!

मुंबईला निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला कायद्याचे पालन करायचे आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेले नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगून, आपण संध्याकाळी ५ वाजता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले.


पोलीस छावणीचं स्वरुप; सीमा सील!

अंतरवाली सराटीमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्यामध्ये दाखल झालं असून अंतरवाली सराटीमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्याप्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून, प्रत्येक गाडी तपासूनच सोडली जात आहे. कोणालाही परवानगीशिवाय या जिल्ह्यांमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. मागील आंदोलनाच्या वेळेस जालन्यामध्ये आमदाराच्या घर पेटवून देण्यात आलं होतं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!