Breaking newsHead linesMaharashtraPoliticsWorld update

मराठ्यांचा वाघ चवताळून मुंबईकडे निघाला; ‘तुझ्या दारात येतो, घे माझा जीव’!

– ‘मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
– ब्राम्हणी कावा माझ्याविरूद्ध चालू देणार नाही, मी मेलो तर मुडदा सागर बंगल्यासमोर टाका!

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी राज्यात मराठा आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील आज (दि.२५) प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी मराठा समाजाची निर्णायक बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल टीका केली. ‘फडणवीस यांनी मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. माझा इन्काउंटर करण्याचा त्याचा डाव आहे. मला बदनाम करण्यासाठी त्याचेच डोके चालू आहे. परंतु, माझ्याविरूद्ध त्याचा ब्राम्हणी कावा चालू देणार नाही. मला मारायचे आहे ना, मी मरायला तयार आहे, तुझ्या सागर बंगल्यासमोर येतो, मीही मराठा आहे, तुला पुरून उरेल’, असे ठणकावून सांगत, जरांगे पाटलांनी अचानक स्टेज सोडले व गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यामुळे काहीकाळ अंतरवली सराटीत एकच गोंधळ पहायला मिळाला. जरांगे पाटलांची आजची टीका राज्य सरकारला चांगलीच झोंबली असून, जरांगे यांंनी मर्यादेत रहावे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर सागर बंगला हा सरकारी बंगला आहे, तेथे कुणीही येऊ शकते, पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कारवाई करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत, जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले, तसेच ते लगेचच मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. जरांगे पाटील म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एक झालेल्या मराठ्यांशी ते काय करू पाहतायत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली. माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. फडणवीसांमुळे अनेकांना भाजपा सोडण्याची वेळ आली. मी ज्या लोकांची नावे घेत आहे, त्यांनी हे सगळं मान्य करायला हवं. ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो,’ तसेच मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर अक्षरशः तोफ डागली. ते म्हणाले, ‘पत्रकारांवर इतका दबाव आहे. त्याला सगळी ताकद दिली. हे सगळे फडणवीसचं काम आहे. त्यात मुंबईचे चार-पाच समन्वयक आहे. तेसुद्धा शिंदे साहेबांच्या आसपास फिरतात. मला बदनाम करण्यासाठी टोळी उभी केली आहे. ते पत्रकार परिषद घेतील आता बघा. त्याला (फडणवीस) इथे यायचं होतं. पण मी येऊ दिलं नाही.’ ‘अमित शाह संभाजीनगरला येणार होता. तो आला नाही. १९ तारखेला मोदी येणार होता. ते आले नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस चिडला. त्याच्या पुढे गेलेलं त्याला खपत नाही. म्हणून मला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. ‘माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,’ असे जरांगे म्हणाले. जरांगे यांनी राष्ट्रवादीतील (अजित पवार गट) काही नेत्यांची नावे घेत या नेत्यांवर फडणवीसांनी दबाव टाकला. त्यांना शरद पवारांची साथ सोडण्यास भाग पाडले, असाही आरोप केला. ‘जीव जरी गेला, फासावर लटकवलं तरी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. मात्र प्रफुल्ल पटेल यांना तुरुंगाची भीती घालण्यात आली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपाशी हातमिळवणी करावी लागली. अजित पवार हे कधीच राष्ट्रवादीला सोडू शकत नव्हते. पण तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपाशी हातमिळवणी केलेली बरी, म्हणून अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं कधीही जमत नाही. छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. फडणवीस तुरुंगात टाकतील म्हणून भुजबळांना अजित पवारांसोबत जावे लागले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची शिवसेना कधीच सोडू शकत नव्हते. मात्र नाईलाजामुळे त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. अशोक चव्हाण यांच्या घरात तीन वेळा मुख्यमंत्रिपद दिलं आहे. ते कधीच काँग्रेस पक्ष सोडू शकत नव्हते. मात्र त्यांन्ाा भाजपात जावे लागले,’ असे मनोज जरांगे म्हणाले.
‘मी समाजाचा नेता म्हणून काहीही करत नाही. सामान्य घरातून आलेला, शेतकर्‍याचा मुलगा म्हणून करत आहे. मला कशाचीही हाव नाही, पण समाजावर प्रेम आहे. त्यासाठीच हे घडलंय. मी स्वार्थी असतो तर आधीच उघडा पडलो असतो. कशाच्या तरी निमित्ताने माणूस उघडा पडतोच. पण मी समाजावरची निष्ठा ढळू दिलेली नाही. माझा देव समाज आहे आणि समाजावर निष्ठा असल्यानं मी समाजाला मायबाप म्हटलं आहे.’ ‘सरकारनं १० टक्के आरक्षण दिलं आहे. आपण ओबीसीतून मराठ्यांना सरसकट मागत आहोत. जे सिद्ध झालं आहे तेच. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध झालंय. पण तुम्हाला सरसकट द्यायचं नसेल तर ज्यांचे पुरावे आढळले, त्यांच्यासाठी सगेसोयर्‍यांचा पर्याय काढला होता. सरकारच्या मदतीनं हा पर्याय काढला होता,’ पण ‘सरकारनं फडणवीसांच्या सांगण्यावर प्रमाणपत्रं देणं बंद केलं. खुमखुमी असेल तर मैदानात या, असे आडाखे वापरू नका,’ असे आव्हाही जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिले.


दरम्यान, जरांगे पाटलांची आजची टीका भाजपचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चांगलीच झोंबली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मनोज जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जो शब्द आम्ही दिला तो आम्ही पूर्ण केला. परंतु जरांगे यांची आजची भाषा ही राजकीय वाटू लागली आहे. सरकार म्हणून इगो ठेवला नाही. पण त्यांनी अशी भाषा वापरण्याची गरज नव्हती. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत बोलले पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, आम्ही संयम ठेवला आहे. त्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना दिला. जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या. जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रमाणिक भावना मनामध्ये ठेऊन लढ्यामध्ये उतरले, अशी भावना आमची होती. त्यामुळे जस्टीस शिंदे कमिटी केली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हत, ते दिलं. त्यानंतर मागणी आली सरसकट द्या, त्यानंतर राज्यात व्याप्ती वाढवा म्हणाले ते आम्ही केलं. आता सगेसोयर्‍यांची मागणी आली. त्यावर नोटीफिकेशन काढलं, त्यावर हरकती आल्या आहेत. त्यांनी ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणाले. वेळोवेळी मागण्या बदलत गेल्या. प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे. जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहे. गृह विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कोणी जर परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही, असा इशारादेखील शिंदे यांनी दिला


सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्या निराशेतून जरांगे ते बोलत आहेत, कोणाला सहानुभूती हवी आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!