शेतकरी हतबल, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – तालुक्यातील मिसाळवाडी व परिसरात माकडांनी हैदोस घातला असून, शेतीपिके व फळबागांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वनविभागाला कळवूनदेखील वनविभागाचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिसाळवाडीचे उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी यासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कानावर हा धक्कादायक प्रकार टाकला असून, तुपकर यांनी तातडीने उपवनसंरक्षकांना फोन लावून माकडांचा बंदोबस्त करून शेतकर्यांना दिलासा देण्याची सूचना केली आहे.
माकडांच्या उच्छादाबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी त्र्यंबक मिसाळ यांनी सांगितले, की मिसाळवाडी शिवारात वानरांनी माझ्या तीन एकर क्षेत्रातील आंबा, चिकू, भुईमूग, हरबरा इत्यादी पिकांची नासाडी करुन हैदोस घातला आहे. तसेच शिवारात इतर शेतकर्यांचेसुद्धा अतोनात नुकसान होत आहे. गावातील गोरगरिबांच्या घरावरील पत्रांचे अतोनात नुकसान होत असून, फार मोठी समस्या तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणात माकडांच्या टोळ्या या भागात आल्या असून, त्या शेतकर्यांना जुमानत नाहीत, उलट त्यांच्याकडून हल्ला होण्याची व एखादी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता आहे. कित्येक वर्ष मेहनत घेऊन फळबाग तयार झाली आहे, आणि ही माकडे एका दिवसांत फळबागांचे नुकसान करत आहे. तरी, या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री मिसाळ यांनी केलेली आहे.
गावातील शेतकरी तसेच उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी या गंभीरप्रश्नी चिखली वनविभागाच्या अधिकार्यांना सांगितले असून, त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे शेवटी वैतागलेल्या शेतकर्यांनी याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, त्यांनी तातडीने उपवनसंरक्षकांना फोन करून कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. तसेच, शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणीही तुपकर यांनी वन अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
—-