BULDHANALONARVidharbha

बिबीच्या आरोग्य केंद्राचा कारभार अजूनही रामभरोसेच!

– रात्रीच्यावेळेस सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर!

बिबी (ऋषी दंदाले) – बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, या केंद्रात रात्रीच्या वेळेस एकही एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी थांबत नाही. केवळ कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकार्‍यांच्या भरवश्यावर हे केंद्र सुरू आहे. दि. २० फेब्रुवारीरोजी सोमठाणा खापरखेड येथील मंदिरावर भगरीतून विषबाधा झालेल्या घटनेला चार दिवस उलटून गेले तरीही आजरोजी या ग्रामीण रुग्णालय येथे एकही जबाबदार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्याऐवजी राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी हे ड्युटीवर हजर असल्याचे निदर्शनात आले आहे.

बिबी हे गाव हायवेवर असून या गावाला पंधरा ते वीस खेडेगावांचा संपर्क आहे. यामध्ये पोलीस स्टेशन, महसूल विभाग, मंडळ कार्यालय, समृद्धी महामार्ग, बाजारपेठ, उपबाजार समिती आहे. या ग्रामीण रुग्णालयात दररोज दीडशे ते दोनशे ओपीडी असते. तसेच पोलीस स्टेशन असल्याकारणाने दवाखान्यात एमएलसी करण्यासाठी नेहमी पोलिसांना एमबीबीएस डॉक्टरांची गरज भासत असते, मात्र त्यासाठी पोलिसांना मेहकर किंवा लोणार येथे एमबीबीएस डॉक्टरांकडे जावे लागते, त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आजही ग्रामीण रुग्णालय बिबी येथे तीन वैद्यकीय अधिकारी आस्थापनेवर असून, डॉ. वैशाली चव्हाण ह्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. डॉ सोनटक्के यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रतिनियुक्ती खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला घेतली आहे व डॉक्टर बुरुकुल हे दोन दिवस ड्युटीवर हजर असतात पण घटना झाल्यापासून आजपर्यंत एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात दिसत नाहीत व येथील इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी हे ग्रामीण रुग्णालय लोणार येथे राहतात. त्यामुळे प्रशासन हे कोणत्या अधिकार्‍याला वाचविण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असाही सूर जनतेतून उमटत आहे. २१ फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोंगटे यांनी ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली असता, याविषयी विचारले गेले असता त्यांनी असे सांगितले की, माझ्या हातात काहीच नाही. येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांची कायमस्वरूपी नेमणूक देणे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे काम आहे.
दि. २४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनमधून ग्रामीण रुग्णालयात एमएलसी आली असता त्या पेशंटला एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी एकही हजर नसल्यामुळे लोणार येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. असे बिबी पोस्टचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांचे ह्या ग्रामीण रूग्णालयाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे जनतेकडून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!