सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील वाघजाई फाटा ते जळगाव या रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करा, या मागणीसाठी वाघजाई सरपंच गजानन शिवाजी सानप तसेच ग्रामस्थांनी १९ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते ते आज (दि.२४) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता काबरे यांच्या लेखी आश्वासनाने सोडले आहे. दरम्यान, या कामाला सुरूवातदेखील झालेली आहे.
वाघजाई ग्रामपंचायत कार्यालयात १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २९ सप्टेंबर २०२३ बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीला रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाले होते. मात्र या आश्वासनाची संबंधित विभागाकडून पूर्तता न झाल्याने वाघजाई सरपंच गजानन सानप यांनी बेमुदत उपोषण पुकारले. निकृष्टदर्जाच्या झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अभियंत्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी तात्काळ घेत, कामाला सुरूवात करण्यात आली, तसेच सरपंच सानप यांची भेट घेऊन त्यांना लेखी देत, उपोषण सोडण्यात आले. त्यात, बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायत कार्यालयास एमबी व इस्टिमेट तात्काळ देण्यात येईल, तसेच सर्व मागण्यांची १५ दिवसात दिलेल्या मुदतीत पूर्ण
न झाल्यास व कामाच्या दर्जात काही उणीव असल्यास उपविभागीय अभियंता बी.एन. काबरे व कनिष्ठ अभियंता एम. एस. भाले देऊळगावराजा विभाग हे संबंधित ठेकेदाराचे लायसन्स काळ्या यादीत यादीत टाकून त्यांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करतील, असे लेखी आश्वासन दिले आहे. हे लेखी आश्वासन प्राप्त होताच सरपंच सानप यांनी उपोषण सोडले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.