ChikhaliDEULGAONRAJAVidharbha

खासगी रूग्णालयांकडून गोरगरीब रूग्णांची आर्थिक लूट!

– अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

अंढेरा (हनिफ शेख) – देऊळगावमहीसह देऊळगावराजा तालुक्यांत खासगी रूग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा फी वसूल केली जात असून, रूग्णांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू आहे. या आर्थिक लुटीला चाप लावावा, अतिरिक्त फी वसूल करणारे देऊळगावमही येथील रूग्णालयाची चौकशी करण्यात येऊन, त्यांनी उकळलेली फी संबंधितांना परत करण्यात यावी, अन्यथा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इरफान मोहम्मद सादिक आदींसह ग्रामस्थांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेले आहे. यानिमित्ताने तालुक्यातील रूग्णांना लूटणार्‍या रूग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर आलेली आहे.

देळगावमही हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून, तीस ते पस्तीस खेड्यात मुख्य बाजारपेठ म्हणून या गावाची ओळख आहे. या महामार्गावर होणारे अपघात व इतर बाबींसाठी देऊळगावमही येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु, तेथे वैद्यकीय सोयीसुविधांची वाणवा असल्याने पेशंट रेफर केले जातात. अशा परिस्थितीत हतबल झालेले नातेवाईक अत्यवस्थ रूग्णांना रात्रीच्या वेळेस खासगी रूग्णालयात दाखल करतात. हे खासगी रूग्णालये अव्वाच्यासव्वा फी उकळत असल्याने रूग्णांची मोठी आर्थिक लूट सुरू आहे. यासंदर्भात नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे अतिरिक्त फी घेणार्‍या डॉक्टरांवर कार्यवाही करणेबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इरफान मोहम्मद सादिक यांनी निवेदन दिले आहे. देऊळगावमहीमध्ये खाजगी रुग्णालय चालकांकडून होणारी लूट थांबावी, व लॅबवाल्यांची कमिशन ठरवून गरज नसताना विविध प्रकारच्या तपासण्या करायला लावणे, अशा डॉक्टरांच्या वागणुकीमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत असून, त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तरी देऊळगावमही येथील खाजगी रुग्णालयांची चौकशी करून या परिसरातील गोरगरीब जनतेला आर्थिक व मानसिक होणारा त्रास थांबावा. आजरोजी विविध आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्यामध्ये हृदयविकार हा सर्वात मोठा आजार असल्याने कुठल्यावेळी कोणताही रुग्ण त्यांच्या रुग्णाला घेऊन गेले असता मोठ्या प्रमाणात त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. तसेच, ज्या डॉक्टरांना २४ तास सेवा देण्याची परवानगी भेटलेली आहे. अशा डॉक्टरांचे परवाने पाहून त्यांना रात्रीच्या वेळेस सेवा देण्याचे सांगावे, किंवा योग्य ती कारवाई करण्यात यावी. काही डॉक्टर लोकांना तीन बेडची परवानगी असल्यास त्यांनी १५ ते २० बेड ठेवले आहे, असा मनमानी कारभार देऊळगावमही येथील खाजगी रुग्णालयामध्ये चालू आहे. आपत्कालीन साधनांची जसे की फायर सिलेंडर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असला पाहिजे किंवा प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण करून घेणे अनिवार्य आहे. परंतु देऊळगावमही येथील खाजगी रुग्णालयामध्ये अशा आपत्कालीन साधनांची पूर्तता होत नाही. अशाप्रकारे शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!