– कृषी सेवा, कृषीनिविष्ठांसह शेतकर्यांना मिळणार सल्ला व मार्गदर्शन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – येथील बसस्थानक रोडवर विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्राचा शुक्रवारी (दि.१०) सकाळी १० वाजता थाटात शुभारंभ झाला. कृषीक्षेत्रातील पदवीधर युवक शशिकांत अण्णा मिसाळ व सचिन दगडुबा तेलंग्रे यांनी यानिमित्ताने व्यवसायक्षेत्रात यशस्वीरित्या पाऊल टाकले आहे.
शशिकांत मिसाळ हे आदर्शगाव मिसाळवाडी येथील असून, त्यांनी कृषीक्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलेले आहे. शेतकर्यांना मोफत कृषिविषयक सल्ला देण्याचे कामही ते करतात. या कृषी सेवा केंद्रातून कृषीनिविष्ठा, औषधी आदींसह शेतकर्यांना मार्गदर्शन व सल्लादेखील दिला जाईल, अशी माहिती शशिकांत मिसाळ यांनी दिली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या या छोटेखानी उद्घाटन समारंभानिमित्त अण्णा तेजराव मिसाळ व दगडुबा पाराजी तेलंग्रे यांच्याहस्ते कृषी सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सौ. संगिता दगडुबा तेलंग्रे, सौ. संध्या अण्णा मिसाळ यांच्यासह बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच, अनेक मान्यवरांनी या दुकानास भेट देऊन शशिकांत मिसाळ व सचिन तेलंग्रे यांना शुभेच्छा दिल्यात. विघ्नहर्ता कृषीसेवा केंद्रामध्ये प्रामुख्याने, शेतकर्यांना शेतीविषयक अचूक मार्गदर्शन, शेतावर येऊन पीक पाहणी, माती परिक्षण, नामांकित कंपन्यांचे कीटकनाशके, बीबियाणे, सेंद्रीय खते, पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन, सेंद्रीय शेतीविषयक मार्गदर्शन, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन आदी सेवा शेतकरीवर्गाला मिळणार आहेत.