मेहकर, चिखलीत धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ; बंडखोरांवर साधणार निशाणा!
– शिवसेना (ठाकरे) पक्षाची उमेदवारी कुणाला? ठाकरे नावाचा गुंता सोडविणार का?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, २३ तारखेच्या त्यांच्या शिवसेनेचे बंडखोर नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकरातील सभेकडे जिल्हावासीयांच्या नजरा खिळलेल्या आहेत. प्रतापरावांना पाडण्यासाठी ठाकरे हे सावधपणे पाऊले उचलत असून, त्यामुळेच ते लोकसभेसाठीची आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. प्रतापरावांना धूळ चारण्यासाठी प्रा. नरेंद्र खेडेकर यशस्वी होतील की नाही, याबाबत खुद्द ठाकरे हे साशंक असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, बुलढाण्याच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीनेदेखील दावा सांगितला असला तरी, प्रकाश आंबेडकर हे ही जागा ठाकरे यांनाच सोडणार असल्याचेही या सूत्राने स्पष्ट केले.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बुलढाणा व हिंगोलीच्या दौर्यावर येत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतून बंडखोरी झालेली आहे. २२ व २३ फेब्रुवारीरोजी बुलढाणा जिल्हा दौरा करताना ते जिल्ह्यात एकूण सहा सभा घेणार आहेत, तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात चार सभा घेणार आहेत. २२ फेब्रुवारीला चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद यात्रेदरम्यान ठाकरे यांच्या घणाघाती सभा होतील, २३ फेब्रुवारीरोजी शेगाव, खामगाव, मेहकर या ठिकाणी सभा घेऊन ते पुढे हिंगोली जिल्ह्यात जाणार आहेत. २४ फेब्रुवारीला उमरेड आणि वसमत या दोन ठिकाणी त्यांच्या सभा असून, या तीन दिवसांच्या दौर्यादरम्यान ठाकरे हे शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शनसुद्धा घेणार आहेत.
बुलढाणा व हिंगोली मतदारसंघातील उमेदवारीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत अद्याप सस्पेन्स कायम आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत बुलढाणाकरिता जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यांना विविध राजकीय पक्षांच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात फारसे अनुकूल मत नसल्याने, व त्यांच्यासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे आव्हान राहणार असल्याने खेडेकर यांच्या उमेदवारीची घोषणा ठाकरे यांनी टाळली होती. आता जिल्हा दौर्यावर आल्यानंतर ते खेडेकर यांच्या नावाची घोषणा करतील की आणखी कुणाचे नाव जाहीर करतील, याकडे शिवसैनिकांसह जिल्हावासीयांचेही लक्ष लागून आहे. ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत प्रतापराव जाधव यांच्यासह बंडखोरांना धूळ चारायची आहे, त्यामुळे ते सावधपणे पाऊले उचलत असल्याचे समजते आहे.
उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा
२२ फेब्रुवारी, गुरुवार
– दुपारी १ वाजता चिखली येथे जनसंवाद कार्यक्रम
– दुपारी ३ वाजता मोताळा येथे जनसंवाद कार्यक्रम
– संध्याकाळी ६ वाजता जळगाव जामोद येथे जनसंवाद कार्यक्रम
२३ फेब्रुवारी, शुक्रवार
– सकाळी १० वाजता संत श्री गजानन महाराज समाधी दर्शन
– सकाळी ११ वाजता खामगाव येथे जनसंवाद कार्यक्रम
– दुपारी २ वाजता मेहकर येथे जनसंवाद कार्यक्रम
– दुपारी ३ वाजता मेहकर येथून हिंगोलीकडे प्रयाण
‘मातोश्री’वर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गद्दारांना काहीही करून पराभूत करायचेच, असा निर्धार ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला होता. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांपैकी काहींनी उमेदवारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे नाव सूचवले होते. तर नंतर काहींनी खासगीत विरोधही केला होता. तथापि, महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्की असे समजून खेडेकर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मात्र, दुसर्याच दिवशी एका पदाधिकार्याने माध्यमांशी बोलताना, उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे सांगून जल्लोषातील हवा काढून घेतली होती. प्रा. खेडेकर यांच्या विजयाबाबत उद्धव ठाकरे हे साशंक आहेत. त्यांच्या डोक्यात वेगळाच उमेदवार असून, तो शेतकरी नेते रविकांत तुपकरही असू शकतो, असे शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेदेखील या मतदारसंघावर दावा केलेला आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीला ‘वंचित’चा फटका बसला होता. बुलढाण्यात ‘वंचित’ला ४२ हजार तर सिंदखेडराजात ४० हजार, जळगावमध्ये ३० हजार तर खामगावात २६ हजार मते मिळालेली आहेत. तथापि, प्रकाश आंबेडकर हे बुलढाण्याची जागा उद्धव ठाकरे यांना सोडण्यास अनुकूल असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे, तथापि, उमेदवार हा निवडणूक येण्याची क्षमता असलेला द्यावा लागणार आहे.
————-