MEHAKARVidharbha

योगामुळे शरीराला ऊर्जा व मनाला शांती मिळते – योगप्रचारक संतोष थोरहाते

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – योगासने, प्राणायामामुळे शरीराच्या अवयवांचेच नव्हे तर मन, मेंदू आणि आत्म्याचं संतुलन साधले जाते. शरीरातील हाडे, स्नायू व सांधे मजबूत होतात. व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपले जाते. शरीर सुदृढ असेल तर आरोग्य ही सुदृढ असते. असे म्हटले जाते म्हणजे शरीर मजबूत असेल तर मन मजबूत राहते. म्हणून आपण प्रत्येकानेच आपल्या आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे. योगामुळे शरीराला उर्जा व मनाला शांती मिळते असे प्रतिपादन योगप्रचारक संतोष थोरहाते यांनी विभाग स्तरीय नेतृत्‍व गुण विकास शिबीरात शिबीरार्थीना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.

शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षण उपसंचालक कार्यालय विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग स्तरीय नेतृत्‍व गुण विकास शिबीराचे आयोजन दि.३ ते ५ फेब्रुवारी रोजी विवेकानंद आश्रमात करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या नेतृत्‍व गुण विकास शिबीरात सकाळच्या योग प्राणायाम सत्रामध्ये शिबिरार्थींना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना योगप्रचारक संतोष थोरहाते म्हणाले की, योगासनांमुळे अंतस्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात. त्याचबरोबर शरीरातील मेद कमी होतो आणि जोम वाढतो. पाठीचा कणा, स्नायू व मज्जातंतू सुदृढ बनतात. पोटातील इंद्रियांचे कार्य सुधारते त्याचबरोबर रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे होते. योगासनांमुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य सुधारते. आकुंचन, प्रसरण, ताण यांमुळे रक्ताभिसरण चांगले होते. योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते. व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक होतो असे त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी योगप्रचारक संतोष थोरहाते यांनी योग, प्राणायामाचे प्रात्‍यक्षिक शिबीरातील शिबीरार्थींना करून दाखविली.

या शिबीराला रासेयो शिबीरार्थींचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी नागपूर विभाग गोंदिया भुवेंद्र चव्हाण, विभागीय समन्वयक नागपूर विलास बैलमारे, विभागीय समन्वयक लातूर डॉ.संदीपान जगदाळे, जिल्हा समन्वयक वर्धा रविंद्र गुजरकर, जिल्हा समन्वयक यवतमाळ गजानन जाधव, विवेकानंद विद्या मंदिराचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.ज्ञानेश्वर गाडे,रासेयो कार्यक्रम अधिकारी वैष्णवी ठाकरे, विभागीय समन्वयक रासेयो अमरावती प्रा.विशाल जाधव तसेच राज्यातून आलेले सर्व रासेयोचे विद्यार्थी,सर्व जिल्हयातील रासेयो जिल्हा प्रमुख,रासेयो विभागीय प्रमुख यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!