चिखली-देऊळगावराजा महामार्गावरील गतिरोधक, प्रवासी निवारे शोभेची वस्तू; धोक्याची सूचना फलकेही नाहीत!
– नॅशनल हायवे विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस
– महामार्ग बांधणीत असंख्य चुका, प्रवासी वाहतूक बनली जीवघेणी
मेरा बु., ता. चिखली (प्रताप मोरे) – देऊळगावराजा ते चिखली या अंतरादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर विविध गावांच्या चौफुल्यांवर अथवा फाट्यावर गतिरोधक तथा प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र बांधण्यात आलेले प्रवासी निवारे व गतिरोधक थातूरमातूर करून टाकल्याने प्रवाशांना उघड्यावर किंवा आजूबाजूच्या इमारतीचा बसण्यासाठी आसरा घ्यावा लागत आहे, तर लहानमोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गाच्या एकूण ७८ किलोमीटरची ब्रेकिंग महाराष्ट्रच्या टीमने पाहणी केली आहे. त्यात असंख्य चुका, आणि तांत्रिक गलथानपणाचा कळस निदर्शनास आला आहे, याबाबतचा सविस्तर अहवालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए असलेल्या चिखली ते देऊळगावराजा हायवेचे सिमेंट चौपदरी करणाचे काम नुकतेच सरंबा फाटा ते चिखलीपर्यंत पूर्ण झाले. मात्र सुपरवायझर, संबंधित अधिकारी यांनी रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात चुका करुन निकृष्टदर्जाचे काम केले आहे. त्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून, रोड फुटला तसेच दबला आहे. तसेच विविध गावाच्या फाट्यावर, चौफुलीवर प्रवाशांना बसण्या उठण्यासाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले असून, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक टाकले आहेत. मात्र बांधण्यात आलेले प्रवासी निवारे चौफुलीवर न बांधता, काही अंतरावर बांधले आहेत. त्यामुळे हे प्रवासी निवारे प्रवाशांच्या सोयीचे नसल्याने प्रवाशांना पावसाळ्यात आजूबाजूला झाडाखाली, हॉटेल, अथवा उघड्यावर थांबावे लागत आहे. या प्रवासी निवार्यांचा वापर अनेक जण भंगार वस्तू, खाजगी वस्तू अथवा जनावरे बांधण्यासाठी करत आहेत. त्याच बरोबर हायवे रोडवरील चौफुलीवर टाकलेले गतिरोधक थातूरमातूर टाकल्याने रोडवरून जाणारी येणारी लहान मोठी वाहने भरधाव वेगाने त्यांच्यावरून जातात.
तसेच सरंबा फाट्यापासून तर मेरा खुर्द फाट्यापर्यत डोगराळ भाग असल्याने ठिकठिकाणी वळणाचा मार्ग व घाट काढण्यात आला, अशा ठिकाणी ठेकेदाराकडून अपघातस्थळ, घाट आरंभ, वळण मार्ग असे अनेक दिशा दर्शविणारे फलक सूचनेसाठी लावले नाही. त्यामुळे भरधाव धावणार्या लहान मोठ्या वाहनांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लावत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्यांची तात्काळ चौकशी करून हायवे रोडची तपासणी करण्याची गरज आहे. सुपरवायझर आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, असे मेरा खुर्द येथील सर्जेराव गवई, सुनील गवई तथा आदी गावकर्यांकडून होत आहे.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!
हा राष्ट्रीय महामार्ग सदोष असून, त्यावर केवळ तांत्रिक चुका व रस्ते बांधण्याचे निकष नीटपणे न पाळले गेल्याने अपघात होत आहेत. आतापर्यंत शेकडो बळी गेले आहेत. या सर्व बळींसाठी महामार्ग बांधणारे अधिकारी, कंत्राटदार यांना दोषी धरण्यात येवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत ब्रेकिंग महाराष्ट्रची टीम, हा मुद्दा राज्य व देशपातळीवर उचलून धरणार आहे.
—————–