BuldanaBULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

सरकार तुरूंगात डांबायला निघालयं, शेतकर्‍यांसाठी एकच काय, दहावर्षे तरूंगात जाईन!

– सातळीत गावकर्‍यांनी घोड्यावर बसवून काढली तुपकरांची मिरवणूक
– मेहकर मतदारसंघातील वढव येथे गावकर्‍यांकडून गावात भव्य मिरवणूक, प्रचंड गर्दीने दिला तुपकरांना विजयाचा निर्धार!

जळगाव जामोद/बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांनी मला वर्षभर तुरुंगात डांबण्याचा घाट घातला आहे. पण ज्या पद्धतीने गावगाड्यातील शेतकरी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत, त्या प्रेमाखातीर एक काय दहा वर्षे तुरुंगात जाईल, पण न्याय्यहक्काची लढाई सोडणार नाही, अशी ग्वाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जळगाव जामोद तालुक्यातील सातळी व मेहकर तालुक्यातील वढव येथे येथे भव्य जाहीर सभांतून बोलताना दिली. मेहकर विधानसभा मतदारसंघातील वढव (ता.लोणार) येथे काल (ता.२) झालेल्या ‘एल्गार परिवर्तन मेळाव्या’ला परिसरातील गावकर्‍यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. जोशपूर्ण वातावरणात गावात मिरवणूक काढून युवकांनी जोरदार स्वागत केले. तर, जळगाव जामोद तालुक्यातील सातळी येथे १ फेब्रुवारीरोजी तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी-कष्टकरी-मजुर व तरुणांचा भव्य असा ‘एल्गार परिवर्तन मेळावा’ पार पडला. युवा आंदोलक अक्षय पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी या मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले होते. मेळाव्याआधी ग्रामस्थांनी रविकांत तुपकर यांना घोड्यावर बसवून त्यांची संपूर्ण सातळी गावातून जंगी मिरवणूक काढली. प्रत्येक घरासमोर माय-माऊल्यांनी रांगोळी काढून, पणत्या लावून स्वागत केले, तसेच माय-माऊल्यांनी रविकांत तुपकरांचे औक्षण केले.

वढव येथे बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, की शेतकरी-कष्टकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी लढतांना मला व माझ्या सहकार्‍यांना अनेक पातळीवर त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. पण त्याला आम्ही भीक घालत नाही, मला तडिपार केले, तुरुंगात टाकले, तरी मी सर्वसामान्यांच्या न्याय्यहक्काची लढाई सोडणार नाही. ही लढाई माझी एकट्याची नसून गावगाड्यातील शेतकरी,मजूर, तरूण, सर्वसामान्य माणसाची लढाई आहे, या लढाईत एक सैनिक म्हणून सहभागी व्हा. तर रस्त्यावरच्या लढाईबरोबर राजकीय परिवर्तनाच्या लढाईतही सहभागी होवून या लढ्याला ताकद द्या, असे आवाहन यावेळी तुपकरांनी केले.
तर सातळी येथे बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांनी मला वर्षभर तुरुंगात डांबण्याचा घाट घातला आहे. पण ज्या पद्धतीने गावगाडयातील शेतकरी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत, त्या प्रेमाखातीर एक काय दहा वर्ष तुरुंगात जाईल, पण न्याय्यहक्काची लढाई सोडणार नाही. हे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला तयार नाही तर लोकप्रतिनिधीही शेतकर्‍यांच्या समस्यावर ब्र शब्दही काढत नाहीत. त्यामुळे आता आपल्या न्याय्य हक्कासाठी आपल्यालाच लढावे लागणार आहे. म्हणून आपण सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी लढा देत आहोत. परंतु शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचे काम काही सत्ताधारी नेते करत आहेत. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना शेतकर्‍यांचा एकजुटीचा दणका दाखवून द्या, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी केले. यावेळी जेष्ठ शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, श्याम अवथळे, अमोल राऊत, सचिन शिंगोटे, नीलेश खुपसे, दीपक पाटील-अढाव, अस्लम शेख, शिरू पाटील, वैभव जाणे, अश्फाक देशमुख, अजय गिरी, सदाशिव जाणे, प्रणव देशमुख, आकाश अटोळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला परीसरातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.


तुपकरांसाठी लोकवर्गणीचा ओघ वाढतोय…

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पाठीशी हजारो कार्यकर्त्यांचे हात सक्षमपणे उभे आहेत. सोबतच रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी लोकवर्गणीचा ओघ वाढतोय, हजारो शेतकरी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत. प्रत्येक गावात होणार्‍या मेळाव्यात रविकांत तुपकर यांच्यासाठी लोकनिधी उभा राहत आहे. साताळी येथेही रामदास सीताराम धनभर (रा.जळगाव जामोद) यांनी २१ हजार रूपयांचा निधी दिला तर नितीन मिसाळ (रा.जळगाव जामोद) यांनी ५१ हजार रुपयांच्या निधीची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!