बिबी (ऋषी दंदाले) – अयोध्येत श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर होणे आणि त्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा होणे हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर मोठा आनंदोत्सव साजरा केला गेला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी नगरी व किनगावजट्टू येथेदेखील रामलल्लाच्या आगमनानिमित्त भव्य सोहळा साजरा झाला. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आल्यात. या शोभायात्रेत ढोल ताशा, लेझीम पथक, झांज पथक, कलश घेतलेल्या महिला, टाळकरी, वारकरी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालकांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामातेची वेशभुषा केली होती.
या यात्रेतील उत्साह अवर्णनीय होता. भगवे ध्वज घेवून असंख्य तरुणांचा सहभाग होता. जय श्रीराम, जय जय श्रीराम जयघोषाने संपूर्ण बिबी नगरी दुमदुमली होती. या कार्यक्रामच्या निमीत्ताने अनेकांनी आपआपल्या घरावर भगवे झेंडे, पताके लावले होते. शोभायात्रेच्या मार्गावर अनेकांनी स्वागतासाठी रांगोळया काढल्या होत्या, अभूतपूर्व निघालेल्या श्रीरामरथ शोभायात्रेत भक्तीमय, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते. शहरातील प्रमुख रस्त्यावर शोभायात्रेचे ठीकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री रामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. या शोभायात्रेत शहरातील आबाल वृध्दासह, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी शरबत वितरण केले. शोभयात्रा मार्गावर श्रीराम भक्तासाठी थंडपेय, नास्ता, आदींची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण शोभायात्रेत संपूर्ण गावकरी उपस्थित असल्याने बंधूभाव समतेचे वातावरण दिसून आले.
यादरम्यान श्री. गजानन महाराज संस्थान बीबी येथून ठीक वेळ ०८:३० वाजता प्रस्थान करण्यात आले होते, पुढील मार्ग स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब प्रवेशद्वार, श्रीराम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अण्णाभाऊ साठे स्मारक, आत्तार गल्ली, श्री रामदेव बाबा मंदिर, श्रीराम भक्त हनुमंत मंदिर, मुस्लिम बांधवांचे धर्मस्थळ मशीद, श्री राम भक्त बाल हनुमान मंदिर, श्री संतोषी माता मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती, श्रीराम पूजन पुढे बस स्टॅन्ड, किनगाव जट्ट रोड, संतश्रेष्ठ सेवालाल महाराज मंदिर, नंतर श्री गजानन महाराज संस्थान बीबी या ठिकाणी रामलल्लाची व संतांची महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाआरती दरम्यान भगवानराव खंदारकर यांच्याकडून शिरा प्रसादाचे वाट करण्यात आले. किनगावजट्टू येथेही लेझीम व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा निघाली. गावकर्यांचा उत्साह अवर्णनीय असा होता. राम मंदिरातील आरतीने शोभायात्रेचा समारोप झाला.
————