ChikhaliCrimeVidharbha

असोलानजीक तरूणीचा अर्धवट जळालेला नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ!

चिखली/सिंदखेडराजा (कैलास आंधळे/अनिल दराडे) – चिखली-जालना महामार्गावरील अंढेरा फाट्यापासून जवळच असलेल्या असोला येथील राजवाडा ढाब्याच्या मागे १९ ते २५ दरम्यान वय असलेल्या तरुणीचा अर्धवट जळालेला व नग्न अवस्थेतील मृतदेह आज (दि.२३) सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडालेली आहे. घटनास्थळी तूप, वात, नारळ आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत असून, तिला जीवंत जाळण्यापूर्वी तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला असून, गळादेखील आवळण्यात आल्याचे दिसून आले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचादेखील संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळासह परिसर पिंजून काढला असून, आरोपीचा कसून शोध सुरू आहे. या तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र आढळल्याने ही तरूणी विवाहित असल्याचे स्पष्ट होत आहे.

सविस्तर असे, की अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील अंढेरा फाट्यापासून जवळच असलेल्या राजवाडा ढाब्याच्या मागे या तरूणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आज (दि.२३) आढळून आला. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार विकास पाटील यांच्या सहकार्‍यांसह धाव घेतली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलिस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी वाघ यांनीदेखील भेट देऊन पाहणी केली, व तपासाबाबत मार्गदर्शन केले. अर्धवट जळालेला मृतदेह आढळलेली तरुणी ही अंदाजे १९ ते २५ वयोगटातील असून, तिच्या हातावर दिल चिन्ह गोंदलेले असून, उजव्या हातावर लाल धागा बांधलेला आहे. तसेच, तिला घटनास्थळी अमानुष मारहाण करून जीवंत जाळल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत होते. वैद्यकीय पथकाने जागेवरच तात्पुरते शवपरीक्षण केले असून, व्हीसेरा राखीव ठेवला आहे. तसेच, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही वाटत होते. घटनास्थळावर तूप, वात, नारळ आढळून आलेले आहे. त्यामुळे ही हत्या लैंगिक अत्याचार करून नरबळीची वाटत आहे. या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विकास पाटील, पीएसआय हरिहर गोरे, हेडकॉन्स्टेबल सोनकांबळे, मोरसिंग राठोड, गजानन वाघ, गोरख राठोड, टेकाळे आदी पोलिस कर्मचारी कसून तपास करत आहेत. ही तरूणी येथे आली कशी, तिला कुणी आणले व कुणी पाहिले आहे का, याचा शोध पोलिस घेत होते. पोलिसांनी घटनास्थळासह परिसर पिंजून काढला असून, आरोपीचे लवकरच धागेदोरे हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. या प्रकरणी अंढरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


चिखली ते अंचरवाडीदरम्यान असलेल्या असोला येथील राजवाडा ढाब्याच्या मागील बाजूस आज सकाळी या तरूणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असून, या तरूणीचे शवपरीक्षण केले गेले असता, तिचा गळा आवळलेला, डोक्यात मागील बाजूने दगडाचा वार केलेला, आणि तरूणीचे अंगातील कपडे तिच्या चेहर्‍यावर टाकून जाळण्यात आलेले आहे. मृतदेह हा अर्धवट जळालेला व नग्नअवस्थेतील होता. घटनास्थळी तूप, नारळ सापडल्याने हा प्रकार कल्पनेपेक्षाही नृशंस असल्याचे जाणीव होत होती. या तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्रदेखील होते, त्यामुळे ही तरूणी विवाहित असल्याचे स्पष्ट होत असून, उजव्या हातावर केशरी धागा, त्याच हातावर दिल चिन्ह, नखावर लाल रंगाचे नेलपॉलीश, व हातात लाल बांगड्या होत्या. त्यामुळे ही तरूणी हिंदू व विवाहित असल्याचे स्पष्ट होत असून, तिची नग्नावस्थेत इतकी निर्घृण हत्या कुणी व का केली, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!