साकेगावने राज्याला आदर्श दिला, परवानगी घेऊनच महापुरूषांचे पुतळे बसवावेत – आदर्श सरपंच बाळू पाटील
– साकेगाववासीयांकडून मिसाळवाडीच्या पदाधिकार्यांचे भावपूर्ण स्वागत
चिखली (महेंद्र हिवाळे) – महापुरूष हे समाजाला प्रेरणा देत राहतात. त्यांच्या कार्याची प्रेरणा तरूणपिढीला, समाजाला सातत्याने मिळत रहावी, यासाठी या महापुरूषांचे पुतळे गावात आवश्यकच आहेत. परंतु, हे पुतळे शासनाची रितसर परवानगी घेऊन बसविले जावेत. आमच्या मिसाळवाडी गावाचीदेखील हीच लोकभावना असल्याने आम्ही साकेगाव गावाने निर्माण केलेला आदर्श पाहण्यासाठी येथे आलो आहोत, असे प्रतिपादन मिसाळवाडी गावाचे आदर्श सरपंच बाळू पाटील मिसाळ यांनी केले. मिसाळवाडी गावाच्या शिष्टमंडळाने बाळू पाटील यांच्या नेतृत्वात साकेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना भेटी देऊन या पुतळ्यांच्या स्थापनेमागील प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी बाळू पाटील बोलत होते. याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मुख्य संपादक तसेच राज्यातील वरिष्ठ पत्रकार पुरूषोत्तम सांगळे यांचीही या शिष्टमंडळात प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सरपंच बाळू पाटील म्हणाले, की महापुरूषांचा आदर्श तरूणपिढीच्या, नव्यापिढीच्या डोळ्यासमोर रहावा, यासाठी मिसाळवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे असावेत, अशी आमच्या गावाची लोकभावना आहे. आम्ही हे पुतळे राज्य सरकारची रितसर परवानगी घेऊनच बसवणार आहोत. याबाबतची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आमचे शिष्टमंडळ येथे आले असून, तुमच्या कामातून मिसाळवाडीच नाही तर राज्याला प्रेरणा मिळाली आहे. साकेगाव येथील तथागत बहुउद्देशीय संस्था यांच्या अथक परिश्रमाने शासनाची रितसर परवानगी मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा थाटामाटात बसविण्यात आलेला आहे. या कामाने या गावातील तरूणांनी राज्यात वेगळा आदर्श प्रस्थापित केलेला आहे. हा आदर्श पाहाता, याबाबतचे सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी मिसाळवाडीचे शिष्टमंडळ साकेगाव येथे आले होते.
या शिष्टमंडळात मिसाळवाडीचे आदर्श सरपंच बाळू पाटील मिसाळ, उपसरपंच तथा गावाचे युवानेते हनुमान मिसाळ, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र ग्रूप’चे संपादक पुरूषोत्तम सांगळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्रभावी वक्ते शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील, मिसाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर सुरडकर यांच्यासह ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना भेटी देऊन, या महापुरूषांना हारअर्पण करून अभिवादन केले. तसेच, तथागत बहुउद्देशीय संस्था, साकेगावच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडून शासकीय परवानगीची रितसर माहिती व कागदपत्रे घेऊन सविस्तर चर्चा केली. आलेल्या शिष्टमंडळाचे संस्थेच्या पदाधिकार्यांकडून शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जितू निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक नेते देविदास लोखंडे, वसंत निकाळजे, विष्णू निकाळजे, सुभाष निकाळजे, संजय निकाळजे, दगडुबा निकाळजे, कैलास धोत्रे, प्रदीप वाकोडे, दामोधर निकाळजे, सुरेखा निकाळजे, लता निकाळजे, रमाबाई वानखेडे, रंजना निकाळजे, वर्षा निकाळजे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
————-