धुळे (प्रतिनिधी) – धुळे तालुक्यातील निमखेडी येथील शेतकऱ्याचा मुलाने चार्टटंट अकाउंटच्या परीक्षेत उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे कुटुंबासह गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळे शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेले निमखेडी येथील शेतकरी रतिभान त्र्यंबक पाटील यांचे चिरंजीव समाधान पाटील याने अभ्यासाच्या जोरावर सीए च्या फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. तसेच लॉकडाऊन लागल्याने समाधान देखील घरी परतला होता. यामुळे त्याने घरूनच अभ्यासाला सुरुवात केली. यानंतर सीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यामुळे निमखेडी येथील मित्रपरिवारासह कुटुंबाने जल्लोष केला. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. निमखेडी शेतकऱ्याच्या मुलाने यश मिळवल्याने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.