हातकणंगलेत राजू शेट्टी, बुलढाण्यात रविकांत तुपकरांना ठाकरेंच्या शिवसेनेची साथ?
– बंडखोरांना पाडणे ही उद्धव ठाकरेंची रणनीती; तुपकरांची लाट रोखणे सर्वच पक्षांना अवघड!
– रविकांत तुपकरांनी घेतला बूथ बांधणीचा आढावा; सर्वच बूथवर खास विश्वासू साथीदार तैनात
बुलढाणा/कोल्हापूर (बाळू वानखेडे/शर्वरी कांबळे) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाशी बंडखोरी करणार्यांना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धूळ चारण्याची रणनीती शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आखली आहे. त्याच धोरणाचा परिणाम म्हणून हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) व बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे हे राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांना आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंची खासगीत भेट घेतली असून, या भेटींत याबाबतची राजकीय रणनीती आखली गेली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. बुलढाण्यातून प्रा. नरेंद्र खेडेकर हे तयारी करत असले तरी, त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने ठाकरे हे तुपकरांवर शिवसेनेत येण्यासाठी जोर देत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रा. संजय मंडलिक हे कोल्हापूरचे आणि धैर्यशील माने हे हातकणंगलेचे खासदार आहेत. हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. या दोनपैकी एका विद्यमान खासदाराला ‘कमळ’ चिन्हावर रिंगणात उतरले जाऊ शकते. त्याची चाचपणी मध्यंतरी भाजपच्या पातळीवर सर्वेक्षणातून करण्यात आली, पण त्याचा अहवाल फारसा चांगला आलेला नाही. त्यामुळे जागा मिळवण्याएवढेच मोठे आव्हान भाजपसमोर उमेदवार देण्याचे आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवर महाआघाडीत ठाकरे गटाने दावा केलेला आहे. पण ताकदीचा उमेदवार ठाकरेंकडे नाही. वास्तविक पाहाता, ध्येर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. परंतु, माने यांनी ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यामुळे माने यांच्याविरोधात शिवसैनिकांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात ठाकरे हे माने यांच्याविरोधात राजू शेट्टी यांना आपली साथ देऊ शकतात, तसे झाले तर खासदार मानेंचा पराभव निश्चित मानला जात आहे. याच अनुषंगाने राजू शेट्टी यांनी ठाकरेंची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूरसारखीच परिस्थिती बुलढाण्यात आहे. शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आलेले प्रतापराव जाधव हे शिंदे यांच्या गटात गेल्याने शिवसैनिकांच्या भावना संतप्त आहेत. शिवाय, खा. जाधव यांच्याविरोधात जोरदार लाट जिल्ह्यात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांसाठी लढणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जिल्ह्यात प्रचंड सहानुभूती निर्माण झालेली असून, तुपकरांनीदेखील स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे. मध्यंतरी तुपकरांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ठाकरे यांचा पाठिंबा मागितला होता. परंतु, तत्पूर्वीच ठाकरेंनी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांना तयारी करण्यास सांगितले असल्याने ठाकरे यांनी तुपकरांना तूर्त शब्द देण्यास टाळले आहे. बदलत्या समीकरणानुसार, उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेल्या काही रिपोर्टनुसार, प्रा. खेडेकर यांना उमेदवारी दिली गेल्यास बुलढाण्याची जागी हातची जाऊ शकते. तसेच, आशीष रहाटे यांना उमेदवारी देणेही धोक्याचे आहे, असे अहवाल ठाकरे यांना मिळाले असल्याचे शिवसेना सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांनाच शिवसेनेत घेऊन उमेदवारी द्यावी, अशी चर्चा ‘मातोश्री’वर झाली असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झालेली आहे. ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणारे प्रतापराव जाधव यांना पाडणे हीच ठाकरेंची सद्या रणनीती असून, त्यादृष्टीने ते नजीकच्या काळात तुपकरांना शिवसेनेची उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
तुपकरांची स्वबळावर तयारी; बूथ तयारीचा घेतला आढावा!
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रमुख पदाधिकार्यांसह बुलढाण्यात बूथ रचना व तयारीचा आढावा घेतला. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना तुपकरांनी पदाधिकार्यांना दिल्या असून, या बैठकीला कार्यकर्ते, पदाधिकार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची घोषणा करतात व नंतर युती किंवा आघाडीशी घरोबा करतात. त्यात निवडणुकीची तयारी केलेल्या कार्यकर्त्याचा बळी जातो. हा प्रकार टाळण्यासाठी तुपकरांनी बुलढाण्यात स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी केली असून, त्यांना बुलढाणा जिल्ह्यात जोरदार समर्थनही प्राप्त होत आहे.
—————