– मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा पुढाकार, विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद
बुलढाणा (बाळू वानखेडे) – ग्रामीण मुलांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढला पाहिजे, यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षक पुढाकार घेत असून, मुलांची नियमित सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाते. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालयात हा आगळावेगळा उपक्रम सुरू असून, याला विद्यार्थी, विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद पण मिळत आहे.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालयात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शाळा आहे. शहरात विविध शिकवण्याची सोय असल्याने सहाजिकच तेथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेला बसतात व खेडूत मुलांच्या तुलनेत चांगले यशही संपादन करतात. तुलनेत खेड़े भागात हा टक्का कमीच असतो, हे नाकारून चालणार नाही. सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आहे. ग्रामीण खे़ड्यातील मुले प्रशासकीय सेवा परीक्षेत म्हणावे तसे उतरत नाहीत. खेड्यातील मुलांचाही स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढला पाहिजे, यासाठी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. वर्तमानपत्र, ग्रंथ, स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचनाची आवड़ निर्माण व्हावी हाच या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजनाचा हेतू असून, गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याचे मुख्याध्यापक अशोक खोरखेड़े यांनी सांगितले. यासाठी सर्व शिक्षक वृंददेखील मेहनत घेत आहेत. या उपक्रमाचे अनुकरण इतर शाळाही करत असल्याचे सांगण्यात येत आहे.