ChikhaliHead linesVidharbha

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना सोडले वार्‍यावर; नातेवाईक संतप्त, स्थानिक डॉक्टर पसार!

– अंढेरा येथील आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर?

सिंदखेडराजा/अंढेरा (अनिल दराडे/कैलास आंधळे) – देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रकिया झाल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार काल, दि. २४ डिसेंबररोजी रात्री घडला. सदर प्रकाराबाबत महिलांच्या नातेवाईक तथा महिलांनी ओरड केल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी भेट दिली असता, तेथे कुठलेच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले व त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नसल्याने सदर प्रतिनिधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनासुद्धा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा फोन न उचलण्यात धन्यता मानली. त्यानंतर सदर प्रतिनिधी यांनी या धक्कादायक प्रकाराबाबत जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सदर प्रकरणात लक्ष घालून आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत, आरोग्य विभागाला वठणीवर आणले. या प्रकाराबाबत परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे.

जिल्हाधिकारी यांनी कानउघाडणी केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत आपबीती सांगितली तर त्यातून सत्य बाहेर आले. कार्यरत आरोग्य अधिकारी हे सुट्टीवर गेलेले आहेत, असे त्यांनी सांगून त्यांची सुट्टी ही १७ डिसेंबर रोजी संपली असतांना ते हजर झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पर्यायी डॉक्टर शिवानंद शिंगाडे यांना पाठविण्यात आले. मात्र तेसुद्धा रात्री आठ वाजता येऊन दहा वाजता परत गेल्याने महिला व नातेवाईक यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच या अगोदर जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठेवण्यात आल्या असता त्या ठिकाणी २० महिला पात्र ठरल्या होत्या व सदर महिलांना वीसतास उपाशीपोटी ठेवून त्या ठिकाणी डॉक्टर आलेच नव्हते. त्या नंतर सर्जरीसाठी खाजगी डॉक्टर बोलावून सर्जरी करण्यात आली होती. ही या घटनेची शाही वाळत नाही तर अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर यांनी उपस्थित राहणे आवश्यक असतांना त्यानी त्याठिकाणी उपस्थित राहण्यास टाळाटाळ करणे हे रुग्णांच्या नातेवाईक मंडळी यांना मनस्ताप सहन करावा लागणारे ठरले आहे. तसेच सेवानगर येथे डेंग्युसदृश रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा त्याठिकाणी संबंधित रुग्णांना उपचार करून सुट्टी झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून त्या डेंग्युसदृश रुग्णांच्या नातेवाईक यांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली व हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एक दिवस त्या ठिकाणी भेट देऊन अवघ्या काही वेळातच पथक परतले होते व त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जाण्यास पथकाला वेळसुद्धा मिळाला नाही. तसेच वातावरणात झालेल्या बदलाने अनेक गावखेड्यात रुग्ण संख्या वाढत असतांना आरोग्य विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असून, जबाबदार अधिकारीसुद्धा आपल्या यंत्रणेला कामचुकारपणाबद्दल पाठीशी घालत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. या आरोग्य केंद्राच्या हद्दीतील उपकेंद्रांचीसुद्धा दुर्देवी अवस्था असतांना या ठिकाणी ‘तेरी भी चूप मेरी
भी चूप हा प्रकार सुरू आहे.


‘अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार गंभीर असून गैरहजर असणारे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यावर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल ‘!
– डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!