तुपकरांच्या नेतृत्वातील आंदोलन शिंदे सरकारने चिरडले!; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्राला पणवती लागली!!
– पीक नुकसान भरपाई, सोयाबीन, कापसाला भाव मागणार्या शेतकर्यांना सरकारने दडपशाहीने दिवसभर डांबून ठेवले, सायंकाळी केली सुटका!
– तुम्ही आता फक्त मते मांगायला गावात या, लोकं तुम्हाला तुमची जागा दाखवतील – तुपकर
नागपूर (विशेष प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला पणवती लागली, अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर घोषणा केली होती, की माझ्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मात्र त्यांच्याच काळात शेतकरी आत्महत्या दहापटीने वाढल्या. ‘बडे बडे बाता आणि शेतकर्यांना लाथा’ असे हे सरकार आहे. या सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही. आता तुम्ही मत मांगायाला गावात याच, तेव्हा दाखवून देऊ, असा इशाराही तुपकरांनी राज्यातील शिंदे सरकारला दिला. येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या पीक नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, पीकविम्याची १०० टक्के अंतिम रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी तुपकरांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकरी विधिमंडळावर धडकले होते. परंतु, हा मोर्चा पोलिसांनी रोखला व तुपकरांसह शेतकर्यांना अटक करून सीआयडी हेडकॉर्टरला डांबून ठेवले. पोलिस बळाचा वापर करून सरकारने तुपकरांचे आंदोलन चिरडले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तुपकरांसह शेतकर्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली, परंतु ते ठोस आश्वासन देऊ शकले नाही. पीक नुकसानीची भरपाई सरकार देणार आहे, एवढेच ते सांगत होते. चर्चा निष्फळ झाल्यानंतर तुपकर चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे तुपकरांसह शेतकर्यांना अटक करून नागपूर पोलिसांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सर्वांची सुटका करण्यात आली. यापुढील आंदोलन आता गनिमीकाव्याने करणार असल्याचे तुपकरांनी जाहीर केले आहे.
राज्य व केंद्र सरकारने शब्द फिरविल्याने तसेच शेतकरीप्रश्नांवर हे सरकार गंभीर नसल्याने नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल करण्याठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेकर्यांची फौज १९ डिसेंबर रोजी नागपुरात धडकली. शेतकर्यांची प्रचंड संख्या पाहता नागपुरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार रस्त्यावर उतरले होते. आजवर कधी नव्हे एवढा बंदोबस्त नागपुरात पहायला मिळाला. एका आंदोलकामागे दोन पोलिस असा तगडा बंदोबस्त होता. तुपकरांच्या नेतृत्वात शेतकर्यांची फौज अधिवेशनावर धडकली. यावेळी आंदोलकांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करुन तुपकरांसह शेतकर्यांना अटक करुन ताबत घेतले. यावेळी आंदोलकांनी कापूस आणि सोयाबीन रस्त्यावर सांडून पोलिस कारवाईचा आणि सरकारचा निषेध नोंदविला. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सीआयडी हेडकॉर्टरला ठेवले. त्यानंतर शेतकर्यांचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी विधानभवनात पोहचले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये डॉ.ज्ञानेश्वर टाले, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, विनायक सरनाईक, दत्तात्रय जेऊघाले, बळीराम सावंत, समाधान गिरी यांचा समावेश होता. परंतु कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांच्या मागण्यांवर सकारात्मक उत्तरे न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकर्यांच्या मागण्यांवर ठोस चर्चा न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे नेत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तुपकरांनी सरकारवर सडकून टीका केली. सोयाबीन, कापसावर सभागृहात चर्चा होत नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की, मी मुख्यमंत्री झालो तर या राज्यात शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही. मात्र दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहे. खरंतर तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून महाराष्ट्राला पणवती लागली आहे. मुंबईच्या प्रश्नांची चर्चा नागपूरच्या अधिवेशनात करून काय करता इथे, आमच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे आणि जर आमच्या प्रश्नांची चर्चा होत नसेल तर अधिवेशन अंडी उबवयाला घेता का? असा खोचक सवाल तुपकरांनी केला. या आंदोलनात तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर यादेखील सहभागी झाल्या होत्या. चोर, दहशतवाद्यांप्रमाणे हे सरकार शेतकर्यांना अटक करत आहे. याचा निषेध करत असल्याचे शर्वरी तुपकरांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विधिमंडळ प्रश्न मांडण्यासाठी असताना प्रतिनिधीच प्रश्न मांडत नसतील तर आम्हालाच प्रश्न मांडावे लागतील. आम्हाला न्याय मिळाला नसून हा लढा सुरूच राहील’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आता आंदोलन गनिमीकाव्याने – तुपकर
हे सरकार शेतकर्यांच्या मागण्यांवर गंभीर नाही. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन तसेच क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारचा आदर्श समोर ठेऊन कुठेही, कोणत्याही मार्गाने गनिमी काव्याने आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. स्ारकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, राज्यभर सभा घेऊन सरकारला धारेवर धरणार असल्याचेही तुपकर यांनी सांगितले. या सरकारला शेतकर्यांचे आंदोलन चिरडण्याचा अधिकार नाही. शेतकर्यांना न्याय देता येत नसेल तर आंदोलन तरी चिरडू नका, सरकारला हे महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ‘यापुढे मतं मागायला गावात येऊ नका, गावात आलात तर तुमची जागा शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही तुपकरांनी ठणकावले.
कर्जबाजारी शेतकर्यांनी अवयव काढले विक्रीला!
या हल्लाबोल आंदोलनादरम्यान हिंगोली येथील शेतकर्यांनी कर्जमुक्तीसाठी किडनी, लिव्हर व इतर अवयव विक्रीला काढले होते. सरकारचे आमचे अवयव विकत घेऊन आमची कर्जमुक्ती करावी, असे फलक हिंगोलीच्या शेतकर्यांनी गळ्यात घातले होते. हे शेतकरी या हल्लाबोल आंदोलनातील विशेष आकर्षण ठरले. खरीप हंगामात लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने पीककर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीस काढलेल्या गोरेगाव (ता.सेनगाव) येथील शेतकर्यांना नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले होते. जोपर्यंत पीककर्जमाफी, पीक नुकसान भरपाईचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे या शेतकर्यांनी यावेळी सांगितले.
आंधी है ये ज़लज़ला है
पुरे जोर पर चला है,
किसमें दम है जो लड़ा है
कौन रह सका खड़ा है..! pic.twitter.com/hOrOXABEgd— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) December 19, 2023