Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

‘बेवड्या दारूपिऊन तुझ्या किडन्या गेल्या’!; भुजबळांची जरांगेंवर जहरी टीका!

– मराठा आरक्षणाला विरोध नाही, ओबीसीत वाटेकरी होण्याला विरोध – भुजबळ
– छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, अन् महाराष्ट्रात दादागिरी करता, हे चालणार नाही, ओबीसींनो एकत्र या – भुजबळ

भिवंडी (विशेष प्रतिनिधी) – ‘आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला’ असा उल्लेख करत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागण्यासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. माझा कार्यक्रम करणार, २४ तारखेनंतर बघू, अश्या धमक्या चालणार नाही. महाराष्ट्रात अजिबात दादागिरी चालणार नाही. कुणीतरी याला सांगा की, तुझी तब्येत सांभाळ, बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडन्या आधी सांभाळ, असे म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर जहरी टीका करत, राज्य सरकारलादेखील सुनावले.

भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे भागात ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव निर्धार मेळावा पार पडला. ओबीसीतील सर्व जातींच्या नागरिकांची या मेळाव्याला विराट गर्दी लोटली होती. याप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. आपण मराठा आरक्षणाच्याविरोधात नाहीत, परंतु ओबीसीत वाटेकरी करण्यास आपला विरोध असल्याचे भुजबळांनी ठणकावून सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे व महाराष्ट्रात दादागिरी करायची, हे चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना दारूड्याशी केली. आधीच माकड त्यात बेवडा प्यायलेला, अशा अर्थाच्या म्हणीचा वापर करत भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागले. भुजबळ म्हणाले, की एकीकडे बाळासाहेब सराटे ओबीसींना दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचे म्हणत हायकोर्टात गेले आहेत. दुसरीकडे जे आंदोलन करत आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. ओबीसीत ३७४ जाती आहेत. जे जुने कुणबी आहेत ते मान्य आहे पण न्या. शिंदे सगळीकडे फिरत आहेत. आता दणादण कुणबी जात प्रमाणपत्र दिली जात आहेत. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे मराठा समाजासाठी निधी खर्च केला जात आहे. ईडब्ल्यूएसमध्येही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. दुसरीकडे, ओबीसी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही, आणि त्यांच्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहे. दुसरीकडे एक रुपयात जागा दिली जातेय आणि महाज्योतीला जागा देण्यासाठी २८ कोटी रुपये द्या, असे सांगितले जात आहे. राज्य सरकार हा भेदभाव करत असल्याबाबत भुजबळांनी सरकारवरही टीका केली. यावेळी त्यांनी गायकवाड आयोगाच्या आकडेवारीचा दाखला दिला. मराठा समाजाचे गट अ, गट ब आणि गट क, गट ड मध्ये किती लोक आहेत, याची आकडेवारी भुजबळ यांनी वाचून दाखवली. ओबीसींना नोकर्‍यांमध्ये साडेनऊ टक्के आरक्षण मिळालेले आहे. आमच्या नोकर्‍यांचा अनुशेष भरा मग नोकर्‍या द्या. मी छगन भुजबळांचा कार्यक्रम करणार अशी धमकी काय देतो जरांगे. जे-जे ओबीसीविरोधात बोलतात त्यांचा येणार्‍या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा, ठिकठिकाणी मोर्चे काढा, कँडल मार्च काढा. लढाईसाठी सज्ज व्हा, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजबांधवांना केले.
भुजबळ म्हणाले, कुणीतरी जरांगेला जाऊ सांगा की, दादागिरी करणे चूक आहे. जाळपोय करणे चुकीचे आहे, गुन्हे मागे घ्या, असा दबाव टाकणे चूक आहे. सरकारला इशारा देणे चुकीचे आहे. कुणीतरी याला सांगा की, तुझी तब्येत सांभाळ, बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडन्या आधी सांभाळ. आमची लायकी काढता अन् ओबीसीमधून आरक्षण मागत आहात. एकीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात याचिका टाकून आम्हाला ओबीसीतून हाकलून लावत आहे. तर दुसरीकडे दादागिरी करून बळजबरी ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत. जस्टीस शिंदे समिती एकप्रकारे चुकीचे काम करु लागली आहे. आमची मुले हुशार आहेत. त्यामुळे त्यांना सगळे मिळत आहे. त्यांच्या कतृत्वाने ते मिळवत आहेत. आजकाल काय चाललंय? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे आणि आमच्यावर हल्ले करायचे. छत्रपतींचा इतिहास हा मावळे म्हणून लिहिला जातोय मराठा म्हणून केला जात नाही. मावळ्यांमध्ये सर्वच होते. मांग, माळी, महार, न्हावी, कोळी, मुस्लिम या समाजातील अनेक लोकांनी महाराजांना साथ दिली. आमचे म्हणणे एवढंच आहे. सारथीला देता ते आम्हाला द्या, ५४ टक्के म्हटले तर साडेसात कोटी लोक हे ओबीसी आहेत. काहीही करायचे आणि काहीही बोलायचे. मराठा समाजाला आरक्षण द्या पण खोटी प्रमाणपत्र घेतली त्यात बाजूला काढून टाका. आम्ही सहा कोटी आहेत असे ते म्हणतात. कुठून आणले तुम्ही हे सहा कोटी? आम्ही ५४ टक्के आहोत. साडेसात कोटी ओबीसी आहे. दादागिरी एवढी वाढली आहे की गाव बंदी केली जाते. आम्हाला गाव बंदी आणि रोहित पवार यांचे स्वागत. जालनामध्ये मिटिंग असेल तर सुट्टी दिली जाते. ही लोकशाही नाही गुंडगिरी आहे. पोलिसांना मारहाण करतो, आम्हाला धमकी देतो. सर्वांनी एकत्र या पक्ष सोडा. महात्मा गांधी यांच्या उपोषणठिकाणी इंग्रज सरकारचे अधिकारी जायचे. तसे आमचे मंत्री त्यांच्या पायाशी जातात, पाया पडतात. हे थांबवायला पाहिजे. जें ओबीसी विरोधात बोलतात त्यांना येणार्‍या इलेक्शनमध्ये दाखवून द्या. माझी वाट पाहू नका. साखळी उपोषण करा, जागोजागी मिटींगी घ्या, कँडल मार्च काढा, असे आवाहनदेखील भुजबळांनी ओबीसी बांधवांना केले आहे.


मराठा समाजात ओबीसीत आला तर आपले राजकीय आरक्षण संपेल!

ओबीसींचे आरक्षण एकटा भुजबळ खातो, असा आरोप मनोज जरांगे करतात, ते खायला काय लाडू पेढा आहे का? तू खातोय ना सासरच्या भाकरी खा तिकडे, असे म्हणून भुजबळांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाची वर्गवारी सांगितली. मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून जे आरक्षण मिळणार आहे ते राजकीय आरक्षण असेल. तुमचा आमचा एकही सरपंच होणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल. आपला एकही माणूस निवडून येणार नाही. हा त्रास सगळ्यांना होणार आहे. जिल्हा परिषद सोडा आणि ग्रामपंचायतदेखील आपल्या ताब्यात येणार नाही. मराठा समाजाला ओबीसीत घेऊन इतर जातींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील भुजबळ यांनी केला. मोदी सरकारने जे आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण दिले. त्यातील ८५ टक्के जागांचा लाभ मराठ्यांनी घेतला. सारथीला मोठ्या प्रमाणात मदत केली जातेय, पण ओबीसींना मदत केली जात नाही. हा भेदभाव मंजूर नाही. धनगर समाजाला योजनेची मदत जाहीर करुन अद्याप मदत मिळालेली नाही. त्यांना जे देताय ते आम्हालाही द्या, हीच आमची मागणी असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!