चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंत्री कोळी येथील पाझर तलावाच्या भिंतीवर खुरटी झुडपे उगवली असून, त्यांची मुळे भिंतीत जात असल्याने भिंतीला तडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही झुडपे वाढत गेली तर पाझर तलावाची भिंत फुटण्याचा धोका पुढील काळात निर्माण होणार आहे. पाटबंधारे खात्याने ही झुडपे काढण्यासाठी तातडीने हालचाल करावी, अशी मागणी परिसरातून पुढे आली आहे.
सविस्तर असे, की अंत्री कोळी येथे पाझर तलाव असून, या तलावाच्या भिंतीवर उगवलेली झाडं-झुडपं प्रशासन कधी काढणार, भिंतीला तडे जाऊन गळती लागण्याची प्रशासन वाट तर नाही ना पाहत?, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठांनी लक्ष घालून तलावाच्या सरंक्षण भिंतींची पाहणी करावी व झाडं-झुडपं काढून भिंत दुरुस्त करण्याची मागणीही पुढे आली आहे. हा पाझर तलाव पूर्ण भरल्यानंतर त्याचा लाभ गावाच्या चौफेर होतो, तर गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटतो. तलाव झाल्यानंतर त्यानंतर संबंधित विभागाने तलावाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. या पाझर तलावाची आतापर्यंत दुरुस्ती झालेली नाही. पाझर तलावाच्या विस्तीर्ण भिंतीवर मोठी झाडे वाढली असल्याने संरक्षक भिंतच दिसत नाही. झाडांची मुळे खोलवर जाऊन भिंतीचे दगड व माती निसटत आहे. तसेच काही ठिकाणी भिंतीचे दगड ढासळले आहेत. भिंतीवर मोठी झाडे उगवली असल्याने भिंतीतून कधीही गळती लागू शकते.
या वर्षी या भागात दुष्काळ असून, पाऊस पडला नसल्याने तलावात पाणी नाही. त्यामुळे सध्या तरी ही भिंत व्यवस्थित आहे. मात्र चांगला पाऊस पडून तलाव पूर्णपणे भरला तर झाडांच्या मुळांतून तलावाला गळती लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तलावाची पाहणी करून झाडे तोडून दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. तलाव झाल्यापासून संबंधित विभागाने तलावाची कधीही दुरुस्ती केली नाही, संबंधित सिंचन विभागाचे पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष असून संबंधितांनी तलावाची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.