BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

पेनटाकळी कालव्याची दुरूस्ती, नुकसानभरपाईही मिळणार!

– शब्द फिरवला तर शेतकर्‍यांना घेऊन अधिवेशनात धडक देऊ, शेतकरी नेत्यांचा इशारा

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – पेनटाकळी धरणाच्या कालव्यांच्या लाभधारक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तसेच आर.सी.सी. ट्रफचा नवीन कॅनॉल बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडणे व गेल्या दोन वर्षांपासून रायपूर, सावत्रा, सोनारगव्हान, मोसेंबेवाडी, मिस्किनवाडी, मारोतीपेठ, जानेफळ, निम्बा, लोणी काळे, गोमेधर, उटी, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, बार्डा येथील शेतकर्‍यांना पाणी न सोडल्यामुळे त्यांची ४ हजार ४४८ हेक्टरची नुकसान भरपाई देणे, तसेच सदर कालवा फुटून पेनटाकळी, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचला या गावांच्या शेतकर्‍यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची नुकसान शेतकर्‍यांना अदा करावी, या मागण्यांसाठी काल (दि.१३) पेनटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. सुरूवातीला संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मात्र ही बाब शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठांशी संपर्क करत माहिती दिली व तात्काळ दखल घेण्यास सांगितले. अन्यथा, मला आंदोलनाच्या ठिकाणी जावे लागेल, अशी भूमिका घेताच संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे, उपविभागीय अधिकारी (व्यवस्थापन) नवले हे बुलढाणा येथून आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्याबाबत कनिष्ठ अभियंता शिंदे यांनी चर्चा करत सर्व मागण्या मान्य करत लेखी दिले. त्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आंदोलनकर्ते शेतकरी व शेतकरी नेते हे आक्रमक झाले व जलाशयात उतरले. जलसमाधी घेण्यावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत अखेर अधिकारी यांना पाचरण करुन सर्व मागण्या मंजूर झाल्यानंतर तात्पुरते सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. जर प्रशासनाने सदर कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकर्‍यांना घेऊन धडक देऊ, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


आंदोलनाच्या दणक्याने मंजूर झालेल्या मागण्या

१) पेनटाकळी, दुधा, ब्रम्हपुरी, पाचला, रायपूर, येथील शेतकर्‍यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. ती मंजूर असून प्राप्त झाल्यावर त्याच दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यावर तातडीने जमा करु.
२. प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या आरसीसी ट्रफच्या कामाची तात्काळ १५ ते २० दिवसात निविदा काढण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी लेखी दिले. संबंधित कालवा फुटण्यास दोषी कर्मचार्‍यांवर कार्यवाही साठी प्रस्ताव सादर करण्यात येईल.
३. पेनटाकळी मुख्य शाखा कालवा ० ते ११ किलोमीटरपर्यंतच्या बर्‍याच गावांना सिंचन झाले नाही, त्यांना पाणी सोडण्यात आले नाही ते शेतकरी रब्बीचे पीक घेऊ शकले नाही, फळबागा सुकल्या, त्या शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी बुलढाणा पाटबंधारे विभाग या कार्यालयाकडुन पंचनामे करुन घेण्यासाठी आदेश देण्यात येतील. पंचनामे करुन त्या शेतकर्‍यांनासुध्दा नुकसान भरपाई मदत देण्यासाठी मागणी केल्याप्रमाणे मदतीचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविण्यात येईल, असे अ.भा.चोपडे कार्यकारी अभियता खडकपूर्णा प्रकल्प विभाग देऊळगावराजा यांनी लेखी दिले.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!