BULDHANAHead linesVidharbha

संतप्त शेतकर्‍यांचा सिंदखेडराजा तहसीलवर मोर्चा; जालना-मेहकर मार्ग रोखला!

शेती विकणे आहे, संतप्त शेतकर्‍यांनी झळकावले फलक!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील पळसखेड चक्का येथील शेतकरी बालाजी सोसे यांचे १० डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून, या आंदोलनाची राज्य सरकारने अद्यापही दखल न घेतल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आज जालना-मेहकर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून सिंदखेडराजा तहसीलवर मोर्चा नेला. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. फळबाग, कापूस, तूर, हरभरा, गहू, शाळू उत्पादक शेतकर्‍यांचे गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी सोसे यांचे आमरण उपोषण सुरू असून, ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे. धक्कादायक बाब अशी, की स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार यांच्यासह राज्य सरकारनेदेखील त्यांच्या प्राणांतिक उपोषणाकडे दुर्लक्ष चालविल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत.

फळबागा, कापूस, तूर, हरभरा, गहू, शाळू उत्पादक शेतकर्‍यांचे गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावा, यासाठी दि. १० डिसेंबरपासून शेतकरी बाळू सोसे यांनी सिंदखेडराजा तहसीलसमोर उपोषण सुरू केले आहे. सदर उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी नायब तहसीलदार यांनी उपोषण मंडपाला भेटदेऊन मागण्यांचे निवेदन घेतले व तिसर्‍या दिवशी यांची प्रकृती खालावल्यामुळे तपासणीसाठी वैद्यकीय पथक पोहोचले. परंतु, मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या १२ दिवसांपासून सोसे यांचे उपोषण सुरूच असून, त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. सोसे यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे पाठवले असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. परंतु, सदर मागण्या ह्या मंत्रालयीन अधिकारात येत असल्यामुळे महसूलमंत्री व मुख्यमंत्री यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा शेतकर्‍याच्या उग्र रूपाला सामोरे जावे लागेल, अशा इशारा शेतकरी देत आहेत.
राज्य सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याचे पाहून, तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी आज मेहकर-जालना मार्ग रोखून धरला, तसेच तहसील कचेरीवर मोर्चा काढला. यावेळी सिद्धेश्वर आंधळे यांनी सांगितले, की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाईल. याप्रसंगी मनोज कायंदे, शिवराज कायंदे यांच्यासह तालुक्यातील हजारो शेतकरी व महिला उपस्थित होत्या. सिंदखेडराजा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील शेतकर्‍यांचे अवकाळी पाऊस, गारपीट व पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पळसखेड चक्का गावामध्ये पंचवीस शेतकरी कंपन्यांमार्फत शेडनेट हाऊसमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम राबवतात. त्यामध्ये प्रमुख्याने मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो यासारख्या शेडनेटमधील बीज उत्पादन केले जाते. जवळपास ९० शेडनेट हाऊस उभारण्यात आलेले असून गारपिट व अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तत्काळ शासनाने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी बाळू सोसे यांनी उपोषण सुरू केले आहे.


सोसे यांच्या उपोषण आंदोलनाला यापूर्वी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, नगरसेवक कैलास मेहेत्रे, शेतकरी नेते दिलीप चौधरी, माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दीपक ठाकरे, मनसे शहराध्यक्ष घनश्याम केळकर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष उल्हास भुसारे आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. हिवाळी अधिवेशनामध्येसुद्धा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तरीही या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने संतापाची तीव्र लाट निर्माण झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!