Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीच संसद सुरक्षेचे धिंडवडे!

– लातूरच्या अमोल शिंदेसह चौघांच्या सुरक्षा यंत्रणेने मुसक्या आवळल्या, कसून चौकशी सुरू!

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा २२ वा स्मृतिदिन साजरा होत असतानाच संसदेच्या सुरक्षेची धिंडवडे काढणारी घटना उघडकीस आली आहे. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी लोकसभेत उड्या घेऊन बुटातून आणलेले पिवळ्या अश्रुधुराची नळकांडी फोडली व तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देत, सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. काँग्रेसचे खासदार गुरूजीतसिंग औजला यांनी तातडीने धाव घेऊ या युवकांना पकडले. तोपर्यंत इतरही खासदार धावून आल्यानंतर या दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे पीठासीन सभापतींनी दुपारपर्यंत कामकाज स्थगित केले. सभापती ओम बिर्ला यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दिल्ली पोलिसांनी सभागृहातील दोन व संसदेबाहेर अश्रुधूर फवारत घोषणाबाजी करणार्‍या एका महिलेसह दोघांना असे एकूण चौघांना ताब्यात घेतले आहे. यातील एक तरूण हा लातूर येथील २५ वर्षीय अमोल शिंदे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. लोकसभेतील सुरक्षा घेरा तोडल्याचा आरोप असलेल्या सागर शर्मा या तरुणाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीवरून लोकसभेत प्रवेश पास मिळवला होता.

बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संसदेबाहेरही दोघांनी गोंधळ घातला. चारही आरोपींची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींचा कौटुंबिक इतिहास आणि २००१ च्या संसदेवरील हल्ल्याशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. लोकसभेत प्रवेश केल्यानंतर उडी मारताच दोन्ही तरुण पुढे सरकू लागले. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या बुटातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून अश्रुधुराचे नळकांडे फोडले गेलेत. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर दिसू लागला. खासदारांनी दोघांनाही पकडून सुरक्षा कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले. सभागृहाचे कामकाज पाहणारे पीठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभेचे कामकाज तातडीने थांबवून सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

https://twitter.com/i/status/1734903208634421642

त्यानंतरसभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले असता, सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले, की आता झालेली घटना चिंतेचा विषय आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून, प्रारंभीक चौकशीत युवकांनी फोडलेल्या नळकांड्यातील धूर हा साधारण धूर होता. सविस्तर चौकशी अहवाल आल्यानंतर अवगत केले जाईल. त्यावर अनेक खासदारांनी संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर चिंता व्यक्त केली.

संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घालणारे चार आरोपी कोण आहेत?

१. नीलमकौर सिंग रा. रेड स्क्वेअर मार्वेâट, हिसार, पंजाब वय ४२
२. अमोल शिंदे, धनराज शिंदे यांचा मुलगा, रा. लातूर, महाराष्ट्र, वय २५ वर्षे.
३. शंकरलाल शर्मा यांचा मुलगा सागर शर्मा (म्हैसूरच्या एका खासदाराने जारी केलेल्या अधिकृत पासद्वारे त्यांनी संसद भवनात प्रवेश केला)
४. मनोरंजन डी एस/ओ देवराज (वय ३५) डी घर क्रमांक २०१६ विजयनगर म्हैसूर दुसरा टप्पा, कर्नाटक, हा बीई कॉम्प्युटर म्हैसूर विवेकानंद विद्यापीठ, बंगलोर (कर्नाटक) येथे शिकत आहे.


विधान भवनाचीही सुरक्षा वाढविली, जादा व्हिजिटर्स पास देण्यास बंदी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, यापूर्वीही मी सदस्यांना जास्तीत जास्त दोन व्हिजिटर पास घेण्याची विनंती केली आहे. आता कोणत्याही आमदाराला दोनच व्हिजिटर पास दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोर्‍हे यांनीही विधान परिषदेच्या सदस्यांना फक्त दोन व्हिजिटर पास दिले जातील, अशी घोषणा केली. यासोबतच नागपुरातील विधानभवनाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
————

https://twitter.com/i/status/1734856642792128772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!