BuldanaChikhaliVidharbha

पेनटाकळी धरणात शेतकर्‍यांचे जलसमाधी आंदोलन

– डॉ. ज्ञानेश्वर टाले, जितुभाऊ अडेलकर, दिलीप बोरेंसह शेतकरी नेते व आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – पेनटाकळी प्रकल्पातील मुख्य कालव्याची तात्काळ दुरूस्ती करून लाभधारक शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी सोडावे, तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, रयत क्रांती पक्षाचे राज्यप्रवक्ते जितुभाऊ अडेलकर, काँग्रेसचे दिलीप बोरे, शिवाजी ढवळे, कैलास उतपुरेंसह शेतकर्‍यांनी आज दुपारी अचानक पेनटाकळी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांसह धरण प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शेतकरी नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पालकमंत्र्यांनी सांगूनदेखील प्रशासन शेतकरीहिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून, तातडीने मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

दि.२३ नोव्हेंबररोजी पेनटाकळी प्रकल्पातील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून लाभधारक शेतकर्‍यांना शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करून शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाई देणेबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलवून निर्णय घेण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तसेच जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना शेतकरी नेते रविकांत पाटील यांनी निवेदन दिले होते. याबाबत पालकमंत्र्यांनीदेखील प्रशासनाला तशी सूचना केली होती. परंतु, प्रशासनाने काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे अखेर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, रयत क्रांतीचे राज्य प्रवक्ते जितुभाऊ अडेलकर, काँग्रेसचे दिलीप बोरे, शिवाजी ढवळे, कैलास उतपुरे यांनी पेनटाकळी प्रकल्पामध्ये उतरुन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत सर्वांना पकडले व जलसमाधी घेण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प २००१ साली पूर्ण होऊन पहिल्यांदा सन २००३ मध्ये कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. सन २०२०-२१ रब्बी हंगामासाठी मुख्य कालव्यातून फक्त २.७०५ घनमीटर इतका विसर्ग सोडल्यानंतर दि.१६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता सुमारास मुख्य कालवा सेवापथ बाजूचा भराव फुटून शेतजमिनीचे नुकसान झाले होते. २०२०-२०२१ ला पेनटाकळी, दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचलासह काही गावातील लाभधारक शेतकर्‍यांच्या शेतीतील नुकसान सन २०२०- २०२१ ला झाल्यामुळे त्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिनांक १३ जानेवारी २०२२ रोजी पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या गळती संबंधित तात्काळ दुरुस्ती करुन नवीन कालवा आरसीसी ट्रफसह करावा. मात्र संबंधित विभागाने याबाबत कुठलाही पाठपुरावा केलेला नसून पेनटाकळी प्रकल्पातील कालव्याच्या लाभधारक शेतकर्‍यांना सिंचन करण्याच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. दोन वर्षापासून प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरलेला असूनदेखील या मुख्य व शाखा कालव्यातून रायपूर, सावत्रा, सोनारगव्हान, मोसेंबेवाडी, मिस्किनवाडी, मारोतीपेठ, जानेफळ, निम्बा, लोणी, काळे, गोमेधर, उटी, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, बार्डा येथील लाभधाराक शेतकर्‍यांना पाणी सोडणे बंद असल्याने शेतकर्‍यांचे शेतीचे खूप नुकसान झाले. या कालव्याची १४ हजार ३३२ हेक्टरची सिंचन क्षमता असूनदेखील केवळ ९ हजार ८८४ हेक्टर एवढेच सध्या सिंचन क्षेत्र आहे. ४ हजार ४४८ हेक्टर वरील शेतकर्‍यांना कालवा ना दुरुस्तीमुळे सिंचन करता येणे शक्य होत नाही. ० ते ११ किलोमीटर कालव्याच्या ना दुरुस्तीमुळे सिंचन क्षमता घटली आहे व सदर ० ते ११ किलोमीटरमधील लाभधारक शेतकर्‍यांना सलग तीन वर्षापासून रब्बी पिकाची पेरणी करता आली नाही व तसेच फळबागांनासुद्धा पाणी न मिळाल्यामुळे फळबाग शेतीचे नुकसान झालेले आहे. पाणी नसल्याने कुठलेही उत्पन्न घेता आले नाही. तसेच पेरणी केलेला खर्चसुद्धा वाया गेलेला असून, सदर कालव्याची ट्रब प्रणालीद्वारे किंवा अस्तरीकरण दुरुस्ती करून लाभधारक शेतकर्‍यांना पाणी मिळणार, असे संबंधित विभागाच्यावतीने नियमित तोंडी सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना पाणी सोडण्यात आले नाही. म्हणून या झालेल्या नुकसानीसाठी ० ते ११ किलोमीटर लाभधारक शेतकर्‍यांच्या नोंदित क्षेत्राप्रमाणे हेक्टरी किंवा एकरी नुकसान भरपाई अदा करावी, दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांच्या दौर्‍या दरम्यान नोंदवलेल्या टिपणीतील बाब क्रमांक २० नुसार ० ते ११ किलोमीटरवरील मुख्य कालव्याची सर्व नादुरुस्त बांधकामे व गळती प्रतिबंधक बांधकामे विभागाने पूर्ण करावीत, व त्यानंतर शासन निर्णयानुसार कालवा हस्तांतरित करून घेण्याचे निर्देश सिंचन विभागास देण्यात यावे, मुख्य धरणाचे अभिलेख त्वरित बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर संबंधित अधिकार्‍याने अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून संबंधित जबाबदार अध्िाकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या प्रस्ताव सादर करावा, पेनटाकळी प्रकल्पातील पाणी कॅनॉलला सोडल्यामुळे झालेल्या शेतजमिनीच्या शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या अहवाल गोषवारानुसार पेनटाकळी, दुधा, रायपूर, पाचला येथील शेतकर्‍यांना ४३२ हेक्टर वरील नुकसान भरपाई रक्कम ३५ कोटी ३९ लाख ०९ हजार ९०० रूपये तात्काळ शेतकर्‍यांना अदा करण्यासंदर्भात उचित कारवाई करण्याच्या सूचना तात्काळ देण्यात याव्यात, सदर रक्कम मंजूर असूनदेखील ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही, ती तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी. सदर कालव्याच्या दुरुस्तीच्या डिझाईनच्या व आरसीसी ट्रफचा प्रस्ताव मान्यतेसाठी नाशिक विभागाकडे ९ महिन्यापासुन प्रलंबित असून, सदर कालव्याच्या आरसीसी ट्रफ कामाला सुप्रमा ५ च्या अधीन राहून शासनाने दिनांक ३ मार्च २०२३ ला तत्वता मान्यता दिली असून, अमोल फुंदे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना तसे पत्र दिले आहे. याकरिता अधीक्षक अभियंता अकोला सिंचन मंडळ अकोला, अधीक्षक अभियंता बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बुलढाणा, कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प विभाग देऊळगांवराजा यांनी पुढील कामासंदर्भात पाठपुरावा करून तात्काळ शेतकर्‍यांना सिंचन होण्याच्या दृष्टीने कारवाई केलेली दिसून येत नाही. त्या संदर्भात वरिष्टस्तरावरून आदेश व्हावेत. सदर मुख्य कालवा तसेच शाखा कालवाच्या संदर्भातील देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्च संदर्भात व कालव्याच्या बाजूने सांडव्याच्या नाल्यांचे काम संबंधित विभागाने न करता देयके काढले, तसेच दुरुस्तीचे कितीवेळा देयक काढले? व व्यवस्थापन यंत्रणेने आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करत सदर नालीवरील अतिक्रमणास प्रतिबंधक कार्यवाही केलेली नाही. कालव्याच्या भागात अतिक्रमण झालेल्या शेतकर्‍यांना कुठल्याही सूचना व त्यावर नियंत्रण ठेवले नाही.

याबाबत विभागीय चौकशी समिती गठीत करून संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करणे बाबत शासनास प्रस्ताव सादर करावा, आदी मागण्यांसाठी हे जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले होते. शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते जितुभाऊ अडेलकर, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप बोरे सह १४ गावातील लाभधारक शेतकरी पेनटाकळी प्रकल्पामध्ये उतरले होते. यावेळी संबंधित प्रशासनाचे काही अधिकारी उपस्थित झाले व लेखी आश्वासन दिले म्हणून सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले गेले असून, मात्र अधिवेशनात शेतकर्‍यांना घेऊन धडक देऊ, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश गारोळे, देवेंन्द्र आखाडे, अनिलभाऊ बोरकर, प्रविण ऊतपुरे, कैलास उतपुरे, सुरेश खरात, शिवाजी ढव्हळे, सुरेश केनेकर, शेतकरी भागवत लहाने, शिवशंकर देशमुख, संतोषभाऊ खरात, श्रीधर लहाने आदींसह १४ गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!