बुलढाण्यातला शेतकरी वाचवायचा असेल तर जिल्ह्यासाठी ‘स्पेशल आर्थिक पॅकेज’ द्या!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी होरपळला आहे. येलो मोझॅकमुळे सोयाबीनही त्याच्या हातातून गेली. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून विदर्भात, खास करून बुलढाणा जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यासाठी ‘स्पेशल आर्थिक पॅकेज’ द्यावे, अन्यथा शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक या जिल्ह्यात सुरू होईल, अशी कळकळीची विनंती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. सोयाबीनला भाव देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, जेणे करून रखडलेले सोयापेंड निर्यातीचे सौदे पुन्हा सुरू होतील, अशी प्रतिक्रियाही तुपकर यांनी व्यक्त केली. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक तथा ब्रेकिंग महाराष्ट्र बिझनेस ग्रूपचे अध्यक्ष पुरूषोत्तम सांगळे यांची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शेतीrप्रश्नांवर तुपकर यांनी अतिशय पोटतिडकीने आपली भूमिका मांडली.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात हे प्रमाण मोठे आहे. याबाबतचे सविस्तर रिपोर्ट सरकार दरबारी आहेत. खरिप व आताच्या रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपिटीने बळीराजा होरपळला होता. त्यातच येलो मोझॅकमुळे सोयाबीन हातातून गेली. पीक नुकसानीची अतिशय तुटपुंजी रक्कम बुलढाणा जिल्ह्याला मिळाली. त्यातून शेतकरी सावरला जाणे कठीण आहे. आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकर्यांना आता कोणताही आर्थिक आधार उरलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याकडे सोयाबीन, कापूस, कांदा उत्पादकांच्या समस्या मांडल्या असून, त्याबाबत त्यांना पर्यायही सूचविले आहेत. केंद्र सरकारने तातडीने सोयापेंडला निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे, निर्यात वाढवावी. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक ब्राझील देशात यंदा अतिपावसाने सोयाबीनचे उत्पादन खराब झाले असून, त्यामुळे भारतीय सोयापेंडला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरपर्यंत तीन लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार भारतीय व्यापार्यांनी केले आहेत. आयातबंदी करून केंद्राने निर्यातीला प्रोत्साहन दिले तर ते आणखी वाढू शकतील, किमान १५ लाख टन सोयापेंड निर्यात होणे गरजेचे आहे. परिणामी, सोयाबीनला चांगला भाव मिळू शकेल. केंद्र सरकारने सोयापेंड आयात तातडीने थांबवावी, पामतेल आयातीवरचे शुल्क वाढवावे, अशी मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी, तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. जेणे करून बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळायला सुरूवात होतील.
शेतकरी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी आम्ही लढत आहोत. परंतु, शेतकर्यांना न्याय देणे, त्यांना मरू न देणे हे सरकारचे काम आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केंद्राकडे बोट दाखवत बसण्यापेक्षा बुलढाणा जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, कारण जिल्ह्यातील शेतकर्यांना आता आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही, अशी स्थिती आहे, असेही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.
विदर्भातील खास करून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातात सद्या अजिबात पैसा नाही, आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले दिसत असल्याने शेतकरी खचून गेला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. मागील १० महिन्यांत एक हजार २०८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे दररोज चार शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. अमरावती विभागातच ९५१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने वेळीच आर्थिक मदत दिली नाही तर आत्महत्यांचा उद्रेक विदर्भात होणार आहे. शेतकरीप्रश्नांवर आंदोलन करणे हे आमचे कामच आहे. शेतकरी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी आम्ही लढत आहोत. परंतु, शेतकर्यांना न्याय देणे, त्यांना मरू न देणे हे सरकारचे काम आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केंद्राकडे बोट दाखवत बसण्यापेक्षा बुलढाणा जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, कारण जिल्ह्यातील शेतकर्यांना आता आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही, अशी स्थिती आहे, असेही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.