‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा दणका; मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर रोडचे काम अखेर सुरू!
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर या चार किलोमीटर रस्त्याची अतोनात दयनीय अवस्था झाली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन अखेर या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत पडलेल्या खड्ड्यांचे पॅचेस दाबून रोडच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. तसेच, रोडचे काम सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे आभार व्यक्त केले आहेत.
मनुबाई, गुंजाळा, मेरा बुद्रूक येथील ग्रामस्थांना चिखली, बुलढाणा जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे महसूल, शिक्षण, दवाखाना, किंवा खरेदीसाठी जाताना याच रोडने जावे लागते. परंतु, रस्ता पूर्णपणे उखडला होता. मेरा बुद्रूक ते अंत्री या रस्त्यावर काही ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. मेरा खुर्द, साखरखेर्डा या रस्त्यावर नेहमी वाहनाची रहदारी असल्याने लहान-मोठे अपघात होत असून, संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्तीची मागणी जोर धरत होती. मेरा बुद्रुक गावातून जाणार्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडलेले असून, त्याच्याकडेसुद्धा संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसून आले होते. साखरखेर्डा – मेरा बुद्रुक – मेरा खुर्द हा रस्ता नेहमी वाहनाने गजबजलेला असतो. ह्या रोड वरून वाहनाची रहदारी ही जास्त असल्यामुळे दिवसातून अनेक वेळा या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता वाहनधारकांच्या जीवावर उठल्याने साखरखेर्डा, मेरा खुर्द रस्त्या रुंदीकरणाची मागणी जोर धरत असल्याने याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्त प्रकाशित करून याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या वृत्ताची दखल घेऊन या रोडचे काम सुरू केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर रस्ता उठला वाहनधारकांच्या जीवावर!