ChikhaliVidharbha

मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर रस्ता उठला वाहनधारकांच्या जीवावर!

– स्थानिक आमदार हिवाळी अधिवेशनात उठवणार का आवाज?; वाहनधारकांचे लक्ष

चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रुक ते अंत्री खेडेकर या चार किलोमीटर रस्त्याचे अतोनात हाल झाले असून, हा रस्ता वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे, तर अनेक वाहनधारकांना किरकोळ अपघातांत कायमचे अपंगत्व आले असून, काही दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. या रस्त्यावरून वाहने नेणे म्हणजे तारेवरची कसरतच वाहनधारकांना करावी लागत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले काटेरी झुडपेसुद्धा अपघाताला निमंत्रण देत आहे. हा रस्ता जागोजागी उखडला तरी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाला लोकांचे मणके तुटत असले तरी काही सोयरसुतक दिसून येत नाही. त्यामुळे या रस्ताप्रश्नी स्थानिक आमदार हिवाळी अधिवेशनात तरी आवाज उठविणार का, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

मनुबाई, गुंजाळा, मेरा बुद्रुक येथील ग्रामस्थांना चिखली, बुलढाणा जाण्यासाठी हाच रस्ता आहे. त्यामुळे महसूल, शिक्षण, दवाखाना, किंवा खरेदीसाठी जाताना याच रोडने जावे लागते. परंतु,रस्ता पूर्णपणे उखडला असून, मेरा बुद्रुक ते अंत्री या रस्त्यावर काही ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. मेरा खुर्द, साखरखेर्डा या रस्त्यावर नेहमी वाहनाची रहदारी असल्याने लहान-मोठे अपघात होत असून, संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. मेरा बुद्रुक गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडलेले असून, त्याच्याकडे सुद्धा संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. साखरखेर्डा – मेरा बुद्रुक – मेरा खुर्द हा रस्ता नेहमी वाहनाने गजबजलेला असतो. ह्या रोड वरून वाहनाची रहदारी ही जास्त असल्यामुळे दिवसातून अनेक वेळा या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता वाहनधारकांच्या जीवावर उठल्याने साखरखेर्डा, मेरा खुर्द रस्त्या रुंदीकरणाची मागणी जोर धरत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. मेरा बुद्रुक फाटा येथे चौफुली असल्याने भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे एखादी मोठी जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे सुद्धा गतिरोधकाची मागणी जोर धरत आहे. मेरा बुद्रुक फाटा ते अंत्री खेडेकर रस्त्याच्या साईडला असलेले काटेरी झुडपाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, त्या सुद्धा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. तरी संबंधित विभागाच्या मेहरबान अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून ह्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावे, रस्त्याच्या साईड वरील अपघाताला कारणीभूत ठरत असलेले काटेरी झुडपे तोडावी, अशी मागणी मेरा बुद्रुक, गुंजाळा, मनुबाई येथील वाहनधारकांसह ग्रामस्थ करीत आहे.


वेळीच प्रशासनाने ह्या रस्त्याबाबत पावले उचलले नाही तर मेरा बुद्रुक, अंत्री खेडेकर, मनुबाई, गुंजाळा येथील वाहनधारक थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्याबाबत तक्रार करणार असल्याचे खात्रीलायक ब्रेकिंग महाराष्ट्रच्या हाती आले आहे.

https://breakingmaharashtra.in/?p=20837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!