BuldanaChikhaliHead linesVidharbha

पुढील आंदोलन गनिमीकाव्याने; सरकारच्या बुडाखाली आग लावू!

– सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे भव्य स्वागत, कापूस-सोयाबीन आंदोलन तीव्र करण्याचा तुपकरांचा इशारा

बुलढाणा/चिखली (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन, कापूस उत्पादकांचा प्रश्न सरकारने 15 डिसेंबरपर्यंत सोडवला नाही, तर त्यानंतर आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकावणारे असेल. आता आम्ही काय करणार आहे, हे सांगणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा कावा वापरू. पण, सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

दरम्यान, सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे आंदोलन केले होते. त्यानंतर तुपकर मुंबईत गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावले. मुंबईत आल्यानंतर तुपकर यांनी काल, सोमठाणा येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिला. तुपकर म्हणाले की, चिखली तालुक्यातील सोमठाणा गावाने सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर उभारलेल्या आंदोलनाला प्रचंड पाठबळ दिले. या गावच्या पाठबळाच्या जोरावरच हे आंदोलन इतक्या ताकदीने मोठे झाले. सरकारला आमच्या मागणीपुढे झुकावे लागले आणि त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावले, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.


गावकऱ्यांनी आंदोलनासाठी निधी दिला!

रविकांत तुपकर म्हणाले की, सोमठाणा गाव हे सोयाबीन, कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले आहे. भविष्यातही ते शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू असेल, असा निर्णय आज आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून घेतला आहे. सोयाबीन, कापूस आंदोलनाच्या संदर्भात जी काही दिशा ठरेल ती याच गावातून ठरेल आणि जो काही निर्णय होईल, तो सोमठाणा गावातच होईल. या गावाने माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर प्रचंड प्रेम केलेले आहे. येथील गावकऱ्यांनी आंदोलनासाठी निधी गोळा केला. एक रुपयासुद्धा येथील गावकऱ्यांनी आम्हा खर्च करू दिला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी सोमठाणा गावात आलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
————–

डॉ.राजेंद्र शिंगणेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!