Breaking newsBuldanaHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha
डॉ.राजेंद्र शिंगणेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी?
– अजित पवार गटाला तीन मंत्रिपदे मिळणार, विदर्भात ताकद वाढविण्याची रणनीती!
मुंबई/नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागणार असून, या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला तीन जागा मिळणार आहेत. त्यात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. डॉ. शिंगणे हे शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांसोबत गेले आहेत. जिल्हा बँकेला आर्थिक मदत द्या, अशी त्यांची त्यासाठी मागणी आहे. परंतु, काही कायदेशीर अडचणींमुळे ही मदत शक्य नसल्याने त्यांना मंत्रिपदावर संधी देण्याचा मानस अजितदादांच्या मनात असल्याचेही खात्रीशीर राजकीय सूत्राने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच अद्याप सुटलेला नाही, त्यातच उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहून आमदार नवाब मलिक हे महायुतीचा भाग नसावेत, अशी मागणी करणारे पत्र आजच अजित पवार यांना दिले आहे. विशेष म्हणजे, हे पत्र सार्वजनिकदेखील झाले आहे. त्यामुळे अजित पवार गट नाराज झालेला असून, मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबाव निर्माण करण्यात आला आहे. त्यानुसार, अजित पवारांशी भाजप नेतृत्वाने चर्चा केल्याची माहिती असून, पवार गटाला आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद, दोन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार असून, मंत्रिमंडळात राजेंद्र शिंगणे यांना संधी मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.