बुलढाणा (संजय निकाळजे) – आपल्या विविध प्रश्न आणि मागण्यांबाबत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सोमवार, ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन पार पडले. यामध्ये ६० महिलांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी सोमवारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलन करत बेमुदत संप पुकारला. यावेळी चारशे महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यातील ६० महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी जागेवरच स्थानबद्ध करून त्यांना नंतर सोडून दिले. मोर्चाने तालुक्याचे मुख्यालय असलेले संग्रामपूर दणाणून गेले होते.’ हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है ,’हम सब एक है अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. अंगणवाडी कर्मचारी युनियन संग्रामपूर तालुका शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मानधन रकमेत वाढ करा, शासकीय दर्जा देण्यात यावा, यासह सात ते आठ महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी संघटनेने अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, उपोषणे केले पण मागण्या पूर्ण होत नसल्याने आता बेमुदत संप झाला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. बस स्टॅन्ड मार्गे मोर्चा पुन्हा बालविकास कार्यालयासमोर परत आला असता तेथे भव्य जाहीर सभा पार पडली. संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष व तुळसाबाई बोपले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. उद्यापासून सर्व अंगणवाडी या बंद ठेवणार असून मागण्या मान्य होईपर्यंत शासनाला कोणताही अहवाल सादर करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी गैरहजर असल्याने परिवेक्षिका वावगे मॅडम यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाचे नियोजनासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सह्यांचे निवेदन दहा दिवसापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार आज भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन करण्यात आले. आजचे जेलभरो आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस स्टेशनच्या कार्यालयीन प्रक्रियेनंतर अटक केलेल्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. उद्यापासून अंगणवाडी बंद राहणार असल्याची माहिती यावेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिली.