तीन राज्यांत भाजपचा डंका; तेलंगणा काँग्रेसने बीआरएसकडून खेचून घेतले!
– काँग्रेसने तीन राज्यांतील पराभव स्वीकारला, काट्याची टक्कर देताना जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मानले आभार
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणार्या मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाचा विजय झाला. तर तेलंगणा या राज्यात बीआरएसकडून सत्ता खेचून घेण्यात काँग्रेसला यश आले आहे. तेलंगणात सत्ताधारी पक्ष बीआरएसला दारुण पराभवाला समोरे जावे लागले. ज्या राज्यांत भाजप विजयी झाले, त्या राज्यांतही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, त्यापैकी तीन राज्यांवर भाजपने सत्ता मिळवली तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली. मिझोराम राज्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. राजस्थानमध्ये ११५, मध्य प्रदेशमध्ये १६५ तर छत्तीसगडमध्ये ५६ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आता खोटी ठरली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपली भूमिकाही मांडली आहे. त्यांनी म्हटलं, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश आम्ही नम्रपूर्वक स्विकारतो. ही विचारधारेची लढाई मात्र सुरुच राहिल. त्याचबरोबर तेलंगणातील जनतेचे मी मनःपुर्वक आभार मानतो. तसेच सर्वसामन्यांचं सरकार स्थापण करण्याचं वचन आम्ही जरुर पूर्ण करु. सर्व कार्यकर्त्यांना त्यांची मेहनत आणि समर्थनासाठी मनापासून धन्यवाद देतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तीन राज्यांतील यशाबद्दल भाजप नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष सी.पी.जोशी, केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जयपूर येथील पक्षकार्यालयात यशाचा आनंद साजरा केला. मध्यप्रदेशात भोपाळ येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव, नरेंद्रसिंह तोमर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नागपूर येथे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यशाचा आनंद साजरा करण्यात आला. बडकस चौक येथे ढोलताशांचा गजर करण्यात आला. मुंबईत अध्यक्ष आशीष शेलार, विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला. पुण्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला.