मराठा आरक्षणाचे वादळ सोमवारी जिल्ह्यात; मनोज जरांगे पाटलांची खामगावात जाहीर सभा
बुलढाणा/खामगाव (बाळू वानखेडे) – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते, मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे विदर्भ दौर्यावर येत असून, त्यांची खामगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावर सोमवारी (दि.४) दुपारी ४ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. भव्य अशा मैदानावर सभेचे नियोजन करण्यात येत असून, सकल मराठा समाज बांधव यासाठी झटत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केल्या पासून, त्यांच्या उपोषण, आंदोलनाला मराठा समाज बांधवांकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप आले आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत असून, महाराष्ट्रातील अनेक शहरात, गावात त्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी मनोज जरांगे हे विदर्भ दौर्यावर येत असून, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव व शेगाव असा त्यांचा दौरा राहणार आहे. या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी खामगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासभेसाठी सकल मराठा समाज बांधव जोरात तयारी करत आहेत. मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आले असून, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. तर सभास्थळी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच विद्युत व्यवस्था, पाणी आदी सुविधांबाबत तयारी करण्यात येत आहे. सभास्थळी गेट क्रमांक १ मधून पुरूष, गेट क्रमांक २ मधून महिला / पत्रकार व पोलिस प्रशासन तर गेट क्रमांक ३ मधून पुरूषांसाठी प्रवेश राहणार आहे. वाहने पार्विंâग केल्यानंतर समाजबांधवांनी सभास्थळी पायी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सात ठिकाणी पार्किंग व्यवस्था
मनोज जरांगे पाटील यांचे सभेसाठी खामगावसह संपूर्ण जिल्हाभरातून सकल मराठा समाज बांधव एकवटणार असून, त्यादृष्टीने वाहनांची पार्विंâग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राणा लकी सानंदा शाळेजवळ शेगाव रोड, जे.व्ही. मेहता विद्यालय, पोलिस परेड ग्राउंड, जि.प.हायस्कूल मुले व मुलींची शाळा, ओंकारेश्वर मैदानासमोरील मैदान चिखली रोड, कृउबास टीएमसी यार्ड अकोला रोड अशी पार्विंâग व्यवस्था करण्यात आली आहे.