– स्वामी विवेकानंद रथयात्रेचे ठीकठिकाणी स्वागत व पूजन
ब्रम्हतीर्थ, जि. वाशिम (आत्मानंद थोरहाते) – निष्काम कर्मयोगी तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांनी पुनर्जीवित केलेल्या आदिवासी तीर्थक्षेत्र भौरद (ब्रम्हतीर्थ) येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी भगवान मल्लिकेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे भव्य अशी महापंगत पार पडली. तब्बल २५ हजार भाविकांनी या एकाच पंगतीतून वांगेभाजी, पुरीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. पू. शुकदास महाराजश्री, स्वामी विवेकानंद व मल्लिकेश्वरांच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता.
पू.महाराजश्री समाधिस्थ होण्याआधीपर्यन्त तिथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला पू. शुकदास महाराजश्री हे जात असतं. कार्तिक पौर्णिमेच्या आधी दिवाळी येते. दिवाळीत सर्व लेकी माहेरला येत असतात. परंतु हे बांधव दिवाळी साजरी करत नाहीत. कार्तिक पौर्णिमेलाच यांची दिवाळी असते. सर्व लेकी, जवाई, आप्तेष्ट सर्व कार्तिक पौर्णिमेला भौरद येथे येतात. कार्तिक पौर्णिमेनिमित्त पू.महाराजश्रींनी येथे भगवान मल्लिकेश्वर पूजनोत्सव सुरू केला आहे. यावर्षी दि.२७ नोव्हेंबर २०२३ रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला. तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. रथयात्रा कशी न्यावी हा प्रश्न विवेकानंद आश्रम व्यवस्थापन मंडळाला पडला होता. परंतु सकाळी ८ वाजता पाऊस थांबला. ‘भोळ्या भाबड्या भक्तांसाठी देवही धावून येत असतो.’ सकाळी ९ वाजता विवेकानंद आश्रम येथे रथारूढ स्वामी विवेकानंद आणि पू.महाराजश्रींच्या प्रतिमांचे पूजन आश्रमाचे अध्यक्ष त्यागमूर्ती आर. बी. मालपाणी सर, उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे सर, ह.भ.प.श्री.गजाननदादा शास्त्री पवार महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेचे प्रस्थान मेहकरच्या दिशेने झाले. विवेकानंद नगरी तसेच नांद्रा धांडे, रथयात्रेचे स्वागत व पूजन करण्यात आले. मेहकर येथे पोहोचल्यावर संपूर्ण शहरामधून जातांना सर्व सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे सर्व जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व तसेच सर्व व्यापारी, अनेक अधिकारी बांधवांनी ठिकठिकाणी रथयात्रेचे स्वागत पूजन केले, तसेच रथयात्रेत सहभागी भाविकांची चहा, पाणी, नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था केली. पुढे हिवरा साबळे, डोणगाव, कुकसा, केनवड येथेही भाविकांनी स्वागत व पूजन केले. दुपारी २ वाजता रथयात्रा भौरद येथे पोहोचली. भौरद येथे पोहोचताच विवेकानंद आश्रम शाखा भौरदचे जेष्ठ सेवाव्रती नारायणमामा गाढे यांनी स्वामी विवेकानंद आणि पू.महाराजश्री यांच्या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर गावामधून शोभायात्रा निघाली. संपूर्ण गावामध्ये रस्त्यांवर माता माऊल्यांनी सुंदर रांगोळी काढल्या होत्या. प्रत्येक घरातील व्यक्ति व महिलांनी रथाचे पूजन केले. दिंड्या, लेझीम पथक, ढोल पथक ह्यामुळे शोभायात्रेत एक वेगळाच आनंद निर्माण झाला. ‘जगद्गुरू स्वामी विवेकानंद की जय! भारत माता की जय! पू.शुकदास महाराज की जय! मुंगसाजी महाराज की जय!’ यांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमून गेले.
दुपारी ४ वाजता सर्व आदिवासी बांधव महाप्रसाद शेतामधे शिस्तीत रांगेत बसू लागले. महाप्रसाद पूजन करण्यात आले. त्यानंतर मेडशी मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्याहस्ते दहीहंडी फोडण्यात आली. तसेच आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठ्या शिस्तीत व शांततेत जमलेल्या सुमारे २५ हजाराच्यावर आदिवासीबंधू भगिनींनी शांततेत महाप्रसाद घेतला. रात्री विवेकानंद आश्रम गायक वृंदांचे गायन झाले. त्यानंतर विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे सर यांनी उपस्थित भाविकांना विवेकानंद आश्रम कार्याची माहिती दिली. शेवटी ह.भ.प. गजाननदादा शास्त्री पवार महाराज यांनी कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रींचे जीवनकार्य, अनुभूति ग्रंथ महिमा यांवर भाविकांना मार्गदर्शन केले. ह्या सोहळयातील संपूर्ण रथयात्रेचे नियोजन पंढरीनाथ शेळके सर, शिवदास सांबपूरे सर, आर.डी.पवार सर, संजय भारती सर यांनी केले. तर संपूर्ण रथयात्रेचे सूत्रसंचालन ह.भ.प.श्री.गजानन दादा शास्त्री पवार महाराज यांनी केले.