आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या महापुराचे पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला असून महापुराचे पाणी दुतर्फा किना-या कडे विस्तीर्ण पसरले आहे. नदी काठाचे रस्ते तसेच जुना ब्रिटिश कालीन पूल रहदारीला बंद केले आहेत. या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिर, राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी, सिद्धबेट किनारा परिसरात घुसले आहे. यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली आहे.
महापुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करुन महापुराचे पाणी पाहत सेल्फी चा आनंद लुटत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही. इंद्रायणी नदी घाटाचा परिसर, भक्ती पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून श्रींचे दर्शन बंद झाले आहे. इंद्रायणी नदी वरील घाटा लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे. भक्ती सोपान पूल ही पाण्या खाली असून के.टी.वेअर बंधारे पाण्यात गेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून वाहून आलेली जलपर्णी आळंदी येथील दोन पुलांजवळ अडकून पडली आहे. जलपर्णीच्या पुलालगत मोठा विळखा दिला असून पुलाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुलाला पाणी लागले असून येथील दोन के. टी बंधारे पाण्यात बुडाले असल्याने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी परिसरात फलक लावून जनजागृती केली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
नदी घाटावरील अनेक संत, महाराज यांचे समाधी पाण्यात बुडालेल्या आहेत. नदीचे दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी, भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. अग्निशामक विभाग, आपत्ति व्यवस्थापन कक्ष कामगार विलास पवार, अक्षय त्रिभुवन, पद्माकर पवार यांचे सह आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव, मुकादम मालन पाटोळे, यांचे माध्यमातून कामगार परिसरात तैनात करण्यात आले आहेत., अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली .
आळंदी पंचक्रोशीत दमदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर पाणी वाहत आहे. सांडपाणी वाहू नलिका क्षमते पेक्षा जास्त पाणी येत असल्याने अनेक ठिकाणी चेंबर मधून पाणी उफाळलेले आहे. चेंबर तुंबल्याने तसेच पाणी जाण्यास मार्ग मिळत नसल्याने हजेरी मारुती मंदिरालगत प्रदक्षिणा मार्गावर पाणी साचले आहे. नदी परिसरात जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीव रक्षक तैनात असून खडा पहारा ठेवला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागानेसह आपत्ती व्यवस्थापन कक्षातुन नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे. इंद्रायणी नदी घाटावरील भक्ती सोपान पूल, भक्त पुंडलिक मंदिर, जोग महाराज यांची समाधी पुराचे पाण्याचे विळख्यात आहे. आळंदी नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी यांनी केले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्याने बळीराजा समाधानी आहे.
पुढील वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली असून अतिरिक्त होत असलेल्या पावसाने उजनी धरण भरण्यास उपयुक्त होणार आहे. परिसर कचरामुक्त ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य देत महापुराचे पाण्यात वाहून आलेला कचरा व जलपर्णी काढण्याचे कामास गती देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. पाण्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याने नदीवर दुतर्फा गर्दी दिसत आहे. पावसाने धुळीचे साम्राज्य कमी झाले आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे पीसीएमटी बसस्टॉप जवळील जुना पूल वाहतुकी साठी पोलीस प्रशासनाने बंद केला आहे. यासाठी पर्यायी जुन्या पुला शेजारील नवीन पुलावरून दुतर्फा वाहतूक वळविण्यात आली असून रहदारी सुरळीत ठेवण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.