BULDHANAHead linesVidharbha

तुपकरांची जोरदार लाट निर्माण झाली असताना लोकसभेच्या आखाड्यात मनसेचीही एण्ट्री!

– शेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय; राज ठाकरेंनीही दिली परवानगी!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जोरदार लाट निर्माण झाली असताना, आणि तुपकर किती लीड घेणार ही चर्चा गावोगावी रंगत असताना, लोकसभेच्या आखाड्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उतरण्याचे जाहीर केले आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड हे संभाव्य उमेदवार राहू शकतात. तुपकरांचा सामना शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव किंवा संजय गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई खेडेकर यांच्याशी होण्याची शक्यता असताना, त्यात आता मनसे उमेदवाराचीदेखील भर पडली आहे.

शेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक आज पक्षाचे नेते तथा माजी आमदार डॉ. जयप्रकाश बावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पक्षाने लोकसभा निवडणूक लढवावी, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भूमिका डॉ. बावस्कर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली. ठाकरे यांनीदेखील तातडीने हिरवा कंदील दिला, आणि डॉ. बावस्कर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे बुलढाणा लोकसभेची जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीनंतर बुलढाणा लोकसभा लढवण्यासाठी मनसेचे जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड हे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभानिहाय बैठका घेऊन बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार निवडून आणणार असल्याचा संकल्प डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मनसे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, राज ठाकरे यांना २० लोकसभा मतदारसंघाचे अहवाल सादर झालेले आहेत. मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, पक्षाला चांगला प्रतिसाद आहे, असे पक्षनिरीक्षकांचे अहवाल असून, उद्या लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे हे मुंबईत बैठकदेखील घेणार आहेत. तसेच, दोन दिवसांत आढावा घेवून ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार असल्याची माहिती मनसेच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे.


बुलढाणा लोकसभा निवडणुकीची लढत एकतर्फी होणार आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात गेलेल्या जनमताचा सर्वाधिक फायदा हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना होणार असून, नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या एल्गार रथयात्रेतून त्यांना खेडोपाडी मोठे जनसमर्थन मिळाल्याने त्यांची लोकप्रियता सिद्ध झाली आहे. तसेच, कालच्या बुलढाणा येथील एल्गार मोर्चातून तुपकर यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले असून, बुलढाण्याच्या इतिहासात इतका विराट मोर्चा पहिल्यांदाच निघाला. जिल्ह्यातील या सर्व राजकीय घडामोडींची माहिती भाजपसह सर्व प्रमुख नेत्यांना पोहोचलेली आहे. त्याची या सर्व नेतृत्वांनी दखल घेतली असल्याचीही माहिती आहे. तुपकर यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असताना, लोकसभेच्या आखाड्यात मनसेनेदेखील उडी घेण्याचे ठरविल्याने राजकीय आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!