Breaking newsHead linesMarathwadaPolitical NewsPolitics

धनगर समाजाच्या मोर्चाला जालन्यात हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालय फोडले!

– धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास सरकार सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जालना येथे धनगर समाजाच्या आरक्षण मोर्चाला हिंसक वळण लागले. जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आंदोलकांना आश्वासन देऊनही ते निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत, असे सांगितले जात असून, त्यामुळे आक्रमक झालेल्या धनगर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. जिल्हाधिकारी पांचाळ हे यापूर्वी सराटी येथील मराठा आंदोलन हाताळतानादेखील चर्चेत आले होते.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने मंगळवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी येण्यासाठी उशीर करीत आहेत, या समजातून आंदोलक संतप्त झाले. या संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली होती. दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन ५० दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने हा विशाल मोर्चा काढण्यात आला होता. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने तसेच जिल्हाधिकारी पांचाळ हे निवेदन घेण्यासाठी खाली येणार होते, पण ते न आल्याने मोर्चेकरांनी जोरदार राडा घातला. संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. मुख्य प्रवेशद्वार तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत व जोरदार घोषणाबाजी करत, संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आक्रमक मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी पांगवल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केले नाही; तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आज राज्यभर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम झाला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत झाला. काल जालना येथील जिल्हाधिकारी यांनी निवेदन घेण्यासाठी खाली येईन, असे सांगितले होते. मात्र आज एक तास वाट बघूनदेखील ते निवेदन घ्यायला आले नाही. त्यामुळे तोडफोड झाली, असे धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

दरम्यान, जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले असतानाच, दुसरीकडे भाजपचे जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी गावातून हाकलून लावले. अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली. आ. कुचे हे गावातील विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी गावकर्‍यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत कुचे यांना उदघाटन कार्यक्रमनानंतर हाकलून लावले. शिराढोण गावात मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!